भारतीय दंड विधानातील ४९८-अ आणि कौटुंबिक कायदे-२००५ मुळे महिलांना झुकते माप दिले असून त्याच्या जाचामुळे अनेक पुरुषांनी आत्महत्या केली, असे प्रतिपादन ‘कुटुंब वाचवा-नाती जोपासा’ चळवळीच्या प्रणेत्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी गुरुवारी बदलापूर येथे केले.
बदलापूरमधील आदर्श महाविद्यालयाच्या वतीने ‘आदर्श वसुंधरा माता’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर बोलताना त्यांनी महिलांनी सोने-नाणे जपण्यापेक्षा सोन्यासारखी नाती जोपासावीत. महिलांनी पुरुषार्थ गाजवायचा असतो, पुरुष व्हायचे नसते, असेही सांगितले.
पुढील पिढी सुसंस्कारी व सक्षम होण्यासाठी आईमधील शिक्षिका आणि शिक्षिकेमधील आई जगली पाहिजे. कारण आणणे, उकरणे, पुरविणे आणि पुढच्या पिढीला देण्यात आईचेच मोठे योगदान असते.  भारतात पदर हा आईचाच असतो, तो बाईचा नसतो. त्या पदराचे धिंडवडे का काढता, असा सवालही त्यांनी यावेळी केला. सपना बदे आणि संगीता वाईकर या दोन मातांचाही यावेळी गौरव करण्यात आला.