राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरलेल्या ‘इन्व्हेस्टमेंट’ या चित्रपटाद्वारे ज्येष्ठ लेखक-नाटककार रत्नाकर मतकरी यांनी रूपेरी पडद्यावर दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. या बहुचर्चित चित्रपटाच्या निर्मात्या प्रतिभा मतकरी यांच्यासह प्रमुख भूमिकेतील तुषार दळवी, सुप्रिया विनोद यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट देऊन मनमोकळ्या गप्पा गेल्या. त्याचा थोडक्यात आढावा..
रत्नाकर मतकरी
हाच विषय घेऊन सिनेमा करावा असे वाटण्यामागचे कारण असे खरे तर नाही. खरे म्हणजे मुलांना मध्यवर्ती ठेवून चित्रपट खूप मोठय़ा प्रमाणावर बनविले जातात. मुलांना साहित्यामध्ये खूप महत्त्व असतेच. गेली आठ-नऊ वर्षे हा चित्रपट करायचा होता. ‘दे धक्का’, ‘बीपी’ या चित्रपटांचा विचार केला तर ते अगदीच वेगळे. केवळ बालसंगोपन हा चित्रपटाचा विषय नाही. मुले शेवटी घरातील आई-बाबा, आजी-आजोबा यांच्या वागण्यातूनच शिकतात. तुम्ही कुठल्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे आणि कुठल्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे नाही हे ठरविता. त्यातूनच मुलंही शिकतात. सिनेमाकडे खूप उशिरा वळलो हे खरे आहे. पण आता संधी मिळाली नसती तर कधीच सिनेमाकडे वळलो नसतो कदाचित. मधल्या काळात सिनेमा कशा पद्धतीने करायचा, हा प्रश्न निर्माण झाला होता. आता आतापर्यंत तो प्रश्न होता. मधल्या काळात विनोदी, कौटुंबिक, रडारडीचे चित्रपट करायचे का, असा प्रश्न होता. निर्माते आधी चित्रपटाचे बजेट, कलावंत ठरवायचे आणि मग शेवटी कशावर चित्रपट करायचा हे ठरवायचे. वैशिष्टय़पूर्ण चित्रपटविषयक दृष्टी असलेले निर्माते फारसे नव्हते. आता ‘इन्व्हेस्टमेंट’ चित्रपटाची पटकथासुद्धा २००६ पासून तयार होती. अमोल गोळेसारखा छायालेखक योगायोगाने भेटला. उत्स्फूर्तपणे सिनेमा माध्यमाचा विचार करण्याची पद्धत अमोल गोळेकडे होती. मग आमच्या चित्रपटाची भट्टी जमून आली. मग सिनेमा केला. डिजिटल कॅमेऱ्याचे फायदे-तोटे दिग्दर्शक म्हणून समजावून घेतले. केवळ प्रोफेशनल अंगाने येणारे लोक आम्ही बाजूला केले.आपला मराठी प्रेक्षक निर्बुद्ध नाहीये. निर्मात्यांची दृष्टी कमी पडते असे जाणवते. प्रेक्षकांना काही कळतच नाही हे गृहीत धरूनच निर्माते चित्रपट बनवितात. चित्रपट ग्रामीण भागात दाखवायचा म्हणजे मग त्यात बाष्कळ विनोद असला पाहिजे, एखादे तमाशाचे गाणे वगैरे असावे असा विचार निर्माते करतात. आमचा हा चित्रपट सांगलीमधील निम्नमध्यमवर्गीय महिलांनाही आवडला, त्याचबरोबर जर्मनी, न्यूयॉर्क महोत्सवांतील प्रेक्षकांनाही रुचला. याचे साधे कारण म्हणजे मराठी चित्रपटाची भाषा म्हणून मधल्या काळात तयार झाली, ज्या पद्धतीने चित्रपट केले जातात त्यात फक्त मराठी प्रेक्षकाचाच विचार केला जातो. याउलट एक गोष्ट आम्ही सरळसोट पद्धतीने मांडली आणि ती जगभरातील लोकांना समजली, आवडली, रुचली.
तुषार दळवी
‘मला जे हवं ते मी मिळवतोच’ असा एके ठिकाणी संवाद आहे. हेच वाक्य मुलगा बोलतो तेव्हा त्याचा संदर्भ अगदीच वेगळा आहे. आशीष जेव्हा ‘मला हवं ते मी मिळवतोच’ असे म्हणतो तेव्हा ते चुकीच्याच मार्गाने मिळविले पाहिजे असे नाही. मुलगा मात्र हेच संवाद अगदी वेगळ्याच संदर्भात वापरतो आणि त्याची एक स्वत:ची समज आहे त्या दृष्टिकोनातून तो हे शब्द वापरतो. हिंदी सिनेमा बघायला दोनशे-अडीचशे रुपये द्यायला प्रेक्षक तयार असतात; परंतु मराठी चित्रपटासाठी १०० रुपयांच्या वर तिकीट असेल तर प्रेक्षक पाठ फिरवतात. मराठीमध्ये ग्लॅमर म्हणजे चांगले विषय, चांगली मांडणी हे आपल्याकडे आहेच. परंतु अनेकदा आपण आपल्यालाच कमी लेखणे थांबविले पाहिजे.
सुप्रिया विनोद
लहान प्रॉडक्शन हाऊसला चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी करणे खूप खर्चिक असते, आणि ते सारे जुळवून आणणे खूप कठीण असते हे आम्हाला जाणवत होते. वेगळ्या प्रकारचा ‘थ्रिलर मनोरंजनपट’ धाटणीचा हा ‘इन्व्हेस्टमेंट’ चित्रपट आहे. गोष्ट पडद्यावर उलगडत जाताना निश्चितपणे प्रेक्षकाचे रंजन होतेच, पण त्यापलीकडेही जाण्याचा प्रयत्न केला आहे. प्राची या प्रमुख व्यक्तिरेखेपेक्षा मी वेगळी आहे. प्राची प्रॅक्टिकल आहे. भावनांचा गुंता लोक उगाच करतात असे या व्यक्तिरेखेला वाटते. प्रगतीचा जो एक मार्ग आपण निवडलाय तो योग्य आहे. त्यामुळे इकडेतिकडे बघायची काही गरज नाही, असे प्राचीचे मत आहे. महत्त्वाकांक्षी असली तरी प्राची खलप्रवृत्तीची म्हणता येत नाही. कारण ती घर व्यवस्थित सांभाळतेय. मुलावर तिचे प्रेम आहे. सासूची ती सगळी काळजी घेतेय. त्यामुळे बरीचशी ती आजची स्त्री आहे. प्रगतीसाठी झटायचे हा तिचा स्वत:चा विचार आहे. असा विचार करणाऱ्या अनेक महिला समाजात आहेत. चित्रपटातील व्यक्तिरेखेप्रमाणे प्रत्यक्षात मी तशी नाही. पण ही भूमिका साकारताना प्राची माझ्यात कुठेतरी असणार याची जाणीव झाली. नाटके करताना प्रत्येक वेळी त्यातील भूमिकेमध्ये आपण झोकून देऊन काम करतोच असे नाही; परंतु प्राची या भूमिकेत वेगवेगळी परिस्थिती, प्रसंगांमध्ये अभिनय करताना प्राची असा विचार करील का, या पद्धतीने भूमिका साकारत गेले. यात प्राची आणि तिचा मुलगा सोहेल या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून एक चांगला प्रश्न प्रेक्षकांमधील महिला आणि त्यांची मुले यांच्यात निर्माण होऊ शकतो. आपण मुलांना वेळ देऊ शकत नाही अशी खंत नोकरी करणाऱ्या महिलांना असते. ही खंत मनात असल्यामुळे मुलांना हव्या त्या वस्तू आणून देणे, त्यांचे नको इतके लाड करते. या चित्रपटामुळे आई-वडिलांमध्ये जागरूकता येईल.