News Flash

मराठी चित्रपटसृष्टीला गरज, पंख पसरण्याची

हिंदू, इंग्रजी, तामिळ, तेलुगू, बंगाली, भोजपुरी अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका करणारा आशुतोष राणा हा गुणी नट ‘येडा’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीतही पदार्पण

| April 14, 2013 01:49 am

मराठी चित्रपटसृष्टी अत्यंत जोमाने फोफावत असून आता चौकटीबाहेर जाण्यासाठी तिला पंख पसरण्याची गरज आहे, असे त्याने सांगितले..
तुझा पिंड लोकरंगभूमी, रामलीला किंवा लोककलांवर पोसला आहे. त्याबाबत काय सांगशील?
– मुळात कला ही माझी सवय नाही, तर तो माझा स्वभाव आहे. निराकार गोष्टीला साकार करतो, तो कलाकार! कला ही मानवासाठीही संस्कृती नसून ती त्याच्या स्वभावाचा भाग आहे. काही भावना या अव्यक्त असतात. त्या भावना साकार करण्याची पद्धत म्हणजे कला! या पद्धतीला एखादी शैली जोडली गेली की मग ती कला लोककला या नावाने ओळखली जाते. ती शैली परंपरेतून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली की, ती लोककला बनते. त्यातील भाव सारखाच असतो. कारण त्याचा पाया सारखा आहे. कोणताही दोष मुक्त केल्यानंतर जे उरते, ते शास्त्रीय असते. म्हणून शास्त्रीय संगीत हे अत्यंत शुद्ध मानतात. पण दोष असूनही जे दोषमुक्त वाटते ते लोकसंगीत किंवा लोककला. मी रामलीलेत रावणाची भूमिका करायचो. या रामलीलेने मला खूप गोष्टी शिकवल्या. सर्वात पहिले माझ्या कलेवर प्रेम करायला शिकवले. आज मी जो काही आहे, त्यात या लोककलेचा खूप मोठा वाटा आहे.
तू एनएसडीसारख्या मातब्बर संस्थेतून अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेस. या क्षेत्रात येण्यासाठी प्रशिक्षणाची गरज किती आहे?
– एखाद्या कुस्तीगिराच्या आयुष्यात तालमीला जे महत्त्व आहे, तेच महत्त्व अभिनेत्याच्या आयुष्यात प्रशिक्षण संस्थेला आहे. प्रशिक्षण संस्था या त्या अर्थाने आखाडय़ाचे काम करतात. व्यावसायिक नाटक, चित्रपट किंवा दूरचित्रवाणीवरील मालिका म्हणजे आमच्या दृष्टीने ऑलिम्पिक आहे. प्रशिक्षण नसेल, तर या खेळात आम्ही चांगले प्रदर्शन करू शकणार नाही. पण नुसते प्रशिक्षण मिळवून प्रदर्शनाची संधी मिळाली नाही, तर त्या प्रशिक्षणाचाही उपयोग नाही. त्या दृष्टीने एनएसडी खूप मदत करते. एनएसडीसारख्या संस्था एखाद्या अभिनेत्याला योग्य ठिकाणी नेण्याचे काम करतात. पण म्हणून प्रत्येक अभिनेत्याने प्रशिक्षण घेतले असलेच पाहिजे का? तर नाही. आज इंडस्ट्रीत अनेक उत्तमोत्तम कलाकार आहेत, ज्यांनी कोणत्याही प्रशिक्षण संस्थेतून अभिनयाचे धडे घेतलेले नाहीत. या सर्वानी प्रत्यक्ष काम करता करता काही गोष्टी आत्मसात केल्या आहेत. पण एक गोष्ट नक्की, अभिनयाची तंत्रे माहिती असतील, तर काम करायला सोपे जाते.
तू बंगाली, तामिळ, तेलुगू, हिंदी, इंग्रजी अशा विविध भाषांमधील चित्रपटांत काम केले आहेस. आता मराठी चित्रपटही येतो आहे. तू स्वत:ला कोणत्या इंडस्ट्रीतला मानतोस?
–  मी स्वत:ला एक अभिनेता मानतो. कलाकाराला भाषेचा अडसर येत नाही. त्यातही सांगायचे झाले, तर मी एक भारतीय अभिनेता आहे. भारतात बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रमुख भाषेत किमान एक तरी चित्रपट करण्याची माझी इच्छा आहे. माझ्या बाबतीत घडलेली गोष्ट म्हणजे मला प्रत्येक भाषेत माझ्या योग्यतेची भूमिका मिळाली. प्रत्येक भूमिका वेगळी होती. माझ्याबाबतीत बोलताना एक टीकात्मक सूर लावला जातो की, मी फक्त नकारात्मक भूमिकाच बजावल्या आहेत. पण प्रत्येक नवी भूमिका पहिल्या भूमिकेपेक्षा वेगळी होती. आणि माझ्या काही सकारात्मक भूमिकाही आहेतच की!
तुझ्या बाबतीत लावला जाणारा आणखी एक टीकेचा सूर म्हणजे तुझ्या चित्रपटांची संख्या! आज तू जवळपास १५ वर्षे इंडस्ट्रीत आहेस. पण त्यामानाने तुझे खूपच कमी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत..
– गंमत अशी आहे की, एका वर्षांत दहा चित्रपट करणारे कलाकारही आपल्याला माहिती आहेत. मात्र त्या दहापैकी किती चित्रपट आपल्या स्मरणात राहतात! क्वचित एखादा. एका वर्षांत दहा चित्रपट करून त्यापैकी एकाही चित्रपटासाठी लोकांनी आपल्याला आठवणीत ठेवू नये, हे मला पसंत नाही. त्यापेक्षा दहा वर्षांत एखादाच चित्रपट करून लोकांच्या अनुभवाचा भाग होऊन त्यांच्या स्मृतीत कायम राहणे मला आवडते. ‘दुष्मन’, ‘संघर्ष’, ‘शबनम मौसी’ अशा कोणत्याही चित्रपटातील माझी भूमिका अजूनही आठवतेय, असे सांगणारे आजही अनेक जण आहेत. मी फक्त चित्रपटांच्या संख्येकडे लक्ष दिले, तर मी माझेच सुख बघेन. पण श्रेष्ठतेवर लक्ष केंद्रित केले, तर मी माझ्याबरोबर माझ्या चाहत्यांच्याही सुखाची काळजी करेन.
मराठी चित्रपटसृष्टीबद्दल तुला काय वाटते?
– मराठी चित्रपटसृष्टी खूप जोमाने प्रगती करत आहे. तुम्हा लोकांना उत्तम आणि अभिजात साहित्याचे लेणे लाभले आहे. संगीत नाटकांपासूनच मराठी लोकांना चांगल्या गोष्टी बघण्याचाच ध्यास आहे. चित्रपटाचा कणा म्हणजे कथा! कथा चांगली असेल, तर चित्रपट चांगला उभा राहतो. चित्रपट शरीर मानला, तर कथा ही त्याचा आत्मा असते. मराठी चित्रपटसृष्टी अशा भक्कम कथांवर उभी आहे. आमचा ‘येडा’ हादेखील अशाच भक्कम कथेवर आधारलेला चित्रपट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी अभिनेते खूप बारकाईने अभिनय करतात. छोटय़ातली छोटी गोष्ट त्यांच्या नजरेतून निसटत नाही आणि ते ती आपल्या अभिनयाद्वारे उत्तम प्रकारे दाखवून देतात. महेश मांजरेकर, नाना पाटेकर, अतुल कुलकर्णी, रीमा, सचिन खेडेकर, सयाजी शिंदे, सोनाली कुलकर्णी या आणि अशा अनेक कलाकारांनी चौकटीबाहेर पडून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध केले आहे. वेगवेगळे प्रयोग करण्याची प्रयोगधर्मिता फक्त महाराष्ट्रातच आहे. महाराष्ट्र ‘संत-समुद्र-साहित्य-समाजसेवक’ यांची भूमी आहे. हे सर्व खूप खोल असते. महाराष्ट्रात ईश्वराची पूजा तर होतेच, पण संतांचीही पूजा होते. या सर्वाचाच एकत्रित परिणाम मराठी चित्रपटसृष्टीवर झाला आहे.
पण असे असूनही मराठी चित्रपटांना म्हणावा तसा प्रतिसाद का मिळत नाही?
– हे असे विधान सर्रास केले जाते. पण एक गोष्ट नीट पाहिली, तर इतर भाषिक चित्रपटसृष्टीतही चांगला धंदा करणारे चित्रपट फक्त १०-१५ टक्क असतात. अगदी हिंदीतही! दुसरी गोष्ट म्हणजे, महाराणा प्रताप यांना भामा शहाचे आर्थिक साहाय्य मिळाल्यानंतरच महाराणा प्रताप मोठे झाले. त्याआधी गवताची गादी म्हणजेच सिंहासन होती त्यांच्यासाठी! मराठी चित्रपटसृष्टीतही असा पैसा टाकणारे निर्माते पुढे सरसावण्याची गरज आहे. चित्रपटातून किती पैसा परत मिळणार, हे न पाहता तो चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी झटणारे निर्माते हवेत. आपली गोष्ट दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उत्साह आपल्यात आहे का? एक लक्षात ठेव, भारत चित्रपटांमुळे खूप जोडला गेला आहे. दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत डब करून दाखवले जातात आणि आपणही ते बघतो. मग एखादा मराठी चित्रपट का नाही हिंदीत डब करून देशभर दाखवला जात? एवढेच कशाला, आज मध्य प्रदेश, गुजरात ते अगदी बिहारमध्येही अनेक मराठी कुटुंबे राहतात. आपण त्यांच्यापर्यंत का नाही मराठी चित्रपट घेऊन जात? दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नेमका याच गोष्टीवर भर दिला जातो. मराठीतील एखाद्या चित्रपटाचा हिंदीत रिमेक झाला पाहिजे. तो आपणच केला, तर स्वार्थ ठरेल. पण एखाद्या हिंदी निर्मात्याने पुढे सरसावून केला, तर त्याला एक स्वाद असेल. मराठी चित्रपटसृष्टीला आता पंख पसरून झेपावण्याची गरज आहे.
पण आजही मराठी निर्माते आणि दिग्दर्शक ‘मराठीला मर्यादित प्रेक्षकवर्ग असतो, खूप कमी मराठी लोक चित्रपटगृहांकडे येतात’ अशी तक्रार करत असतात..
– एक लक्षात घे, चित्रपटात बोलण्याच्या भाषेला महत्त्व नाही. चित्रपटात भाव महत्त्वाचा असतो. तो भाव अचूक पकडणारा चित्रपट या बोलण्याच्या भाषेच्या, प्रांताच्या, धर्माच्या सीमा ओलांडून मनाला भिडतो. आज आपण सगळेच खूप सांप्रदायिक झालो आहोत. आपल्या आनंदात आपण दुसऱ्याला समाविष्टच करून घेत नाही. सोपी गोष्ट आहे. आपण दुसऱ्याच्या आईचा आदर करत नसू, तर दुसराही आपल्या आईचा आदर करणार नाही. भावनेला कोणतीही भाषा नसते. तसे असते, तर आज मुक्यांना जगणे अशक्य झाले असते. एकाही माणसाने घरात प्राणी पाळले नसते. जगात भाषेला नाही, भावाला महत्त्व आहे, हे खूप कमी जण ओळखतात. तुलसीदासांनी एका ठिकाणी म्हटले आहे, ‘भावप्रधान विश्व रचि राखा’. त्यांनी कुठेही भाषाप्रधान हा शब्द नाही वापरलेला. हे फक्त आपण आपल्या अस्तित्वाची घोषणा करण्यासाठी भाषेचा आधार घेतो.
 तुझ्या मते चित्रपटांचे समाजातील नेमके स्थान काय?
– चित्रपट, साहित्य आणि समाचार हे समाजाचे प्रतिनिधी नाही. ते समाजाचे प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब हे मूळ बिंबाला सुधारण्याचे काम करते. आपण आरशात आपले प्रतिबिंब पाहतो आणि चेहरा, केस ठाकठीक करतो. चित्रपटही नेमके हेच आरशाचे काम करत असतात. हिंदीत वाटून घेणे या शब्दासाठी ‘बांटना’ हा शब्द आहे. आता याचा अर्थ एकमेकांसोबत वाटणे किंवा शेअर करणे असाही होतो आणि एकमेकांत वाटणे म्हणजे सेपरेशन असाही होतो. आपल्याला चित्रपट पहिला अर्थ शिकवतात.
‘येडा’मधील तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील?
– या चित्रपटात मी ‘अप्पा कुलकर्णी’ ही भूमिका साकारतो आहे. हिंदीत या पात्राचे वर्णन तीन शब्दांत करता येईल. ‘सडा हुवा संत ज्ञानी’! अप्पा कुलकर्णी हे पात्र ‘काम-क्रोध-मद-लोभ’ या चक्रात अडकलेले आहे. त्याची कामना खालच्या पातळीवर जाते. ऐषोआरामावर त्याचा विश्वास नाही. पण तो त्याला हवा आहे. फक्त हवा आहे. स्वत: उपाशी राहून घरात भरपूर पैसा साठवून ठेवणारी काही माणसे असतात. अप्पा कुलकर्णी त्यातला आहे. अशा एका व्यक्तीची ही कहाणी आहे. दुसरी गोष्ट अशी की, मराठी चित्रपटांत ‘थरारकथां’ना प्रेक्षकवर्ग नाही, असे मला अनेकांनी सांगितले. पण मग आपण हिंदीत किंवा इंग्रजीत बनलेले थरारपट पाहत नाही का? तर आवडीने पाहतो. मग मराठीतील थरारपटांनाच अशी वागणूक का? तर माझ्या मते, मराठी लोकांना तेवढय़ा चांगल्या दर्जाचा थरारपट दाखवला, तर ते नक्कीच बघतील. असाच एक थरारपट आम्ही घेऊन आलो आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2013 1:49 am

Web Title: marathi film industry need to spread the wing
Next Stories
1 रंगात रंगुनी वेगळी ‘संस्कार भारती’ची रांगोळी!
2 बोरीवलीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
3 अनुदानाची गरजच काय?
Just Now!
X