सुरगाणा तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन गायकवाड यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन संशयितांना अटक झाल्यामुळे मागे घेण्यात आले. या पाश्र्वभूमीवर, महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामाच्या वेळा निश्चित कराव्यात, संवेदनशील परिसरात त्यांना सुरक्षितता पुरवावी अशी मागणी केली होती. कामाच्या वेळेबद्दल शासन सकारात्मक हालचाली करत असले तरी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुरक्षितता देण्यास मात्र असमर्थता दर्शविली गेली.
सुरगाणा तालुक्यातील बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन गायकवाड आपले काम करत असताना आंतररूग्ण विभागातील महिलेचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉ. गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला चढविला होता. या घटनेचा निषेधार्थ गत दोन दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातील कामकाज बंद होते. याबाबत मॅग्मोच्यावतीने आरोपींवर महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था कायदा २०१० अंतर्गत कारवाई होत नाही, तोपर्यंत राज्यभर कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला गेला. बुधवारी सकाळी सात संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये, गोरगरिब जनतेला तातडीची सेवा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे. या प्रकरणात संशयितांवर डॉक्टर संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर, संघटनेने आरोग्य सेवेतील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाच्या वेळा निश्चित कराव्यात तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांसह आरोग्य संस्थांना तातडीने कायम संरक्षणाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. त्यापैकी कामाच्या वेळा निश्चित करण्याच्या मागणीस तत्वत: मान्यता मिळाली. परंतु, सुरक्षेच्या संदर्भात प्रशासनाने हतबलता व्यक्त केली असल्याचे मॅग्मोचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश आहेर यांनी सांगितले.