गेल्या सहा महिन्यांपासून उदघाटनाच्या प्रतीक्षेत असलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आकस्मिक वैद्यकीय सेवा विभाग मंत्र्यांची वाट न पाहता मेडिकल प्रशासनाने अखेर उद्घाटनाशिवायच सुरू केला असून रुग्णांना सेवा देणे सुरू करण्यात आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या अनेक वर्षांंपासून नेत्ररोग विभागाकडे असलेल्या इमारतीचे नूतनीकरण करून त्या जागी आकस्मिक वैद्यकीय सेवा विभाग सुरू करण्यात आला. या नूतनीकरणावर कोटय़वधी रुपये खर्च करून हा विभाग सुसज्ज करण्यात आल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून केवळ वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना वेळ मिळत नसल्यामुळे उद्घाटन सोहळा लांबणीवर टाकण्यात आला होता. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर २९ डिसेंबरला या नव्याने बांधण्यात आलेल्या वास्तूचा उद्घाटन सोहळा ठरविण्यात आला होता. त्याला वैद्यकीय शिक्षणमंत्री येणार होते. त्यामुळे त्यावेळी सर्व तयारी करण्यात आली, मात्र कुठले तरी कारण सांगून तो रद्द करण्यात आल्याचे मेडिकल प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मेडिकलमध्ये दररोज हजारो रुग्ण येतात, मात्र या आकस्मिक वैद्यकीय सेवा विभागाचा काहीच उपयोग नसल्यामुळे तो लवकर सुरू करण्यात यावा, यासाठी मधल्या काळात काही सामाजिक संघटनांनी अधिष्ठात्यांकडे मागणी केली होती. त्यानुसार ७ जानेवारीला उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला. या आकस्मिक वैद्यकीय सेवा विभागासोबत ट्रामा केअर सेंटरच्या बांधकामाच्या शुभारंभाचा कार्यक्रम ठरविण्यात आला. वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित, पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासह विदर्भातील मंत्री उपस्थित राहणार होते. उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. सगळीकडे पत्रिका वाटण्यात आल्या. उद्घाटन सोहळ्याच्या तयारीसाठी जवळपास ९७ हजाराचा खर्च करण्यात आला, मात्र ऐन वेळेवर पालकमंत्र्यांसह काही मंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे कारण सांगून उद्घाटनाचा सोहळा काही तास आधी रद्द करण्यात आला. एकीकडे मेडिकल प्रशासनाने उद्घाटन सोहळ्याची सर्व तयारी केली असताना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी मात्र प्रसार माध्यमांना उद्घाटन सोहळ्याबाबत मला काहीच माहिती नसल्याचे सांगून मेडिकल प्रशासनाची गोची केली. उद्घाटनासाठी केवळ मंत्र्यांची वेळ मिळत नसल्यामुळे लांबणीवर पडत असलेला आकस्मिक वैद्यकीय सेवा विभाग उद्घाटनाशिवायच बुधवारपासून मेडिकल प्रशासनाने सुरू केला असून रुग्णांना सेवा देणे सुरू केले आहे. तीन मजली असलेल्या या विभागात सर्व अत्यावश्यक साधने उपलब्ध करण्यात आली आहे.

‘ट्रायल बेसीस’वर विभाग सुरू -डॉ. पोवार
या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, हा विभागाचा उद्घाटन सोहळा लांबणीवर पडत असल्यामुळे ‘ट्रायल बेसीस’ वर सुरू करण्यात आला आहे. उद्घाटन झाल्यानंतर कुठे काही कमी असू नये त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी डॉक्टरांच्या नियुक्तया करण्यात आल्या असून सर्व उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. रुग्णांना सेवा दिली जात असली तरी लवकरच या विभागाचा उद्घाटन सोहळा होईल, असेही ते म्हणाले.

उद्घाटनावर जास्त खर्च नाही -शिनगारे
या विभागाचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला असला तरी त्यावर खर्च करण्यात आलेला निधी हा मेडिकल किंवा दंत महाविद्यालयाच्या खात्यातून करण्यात आलेला नाही. सजावटीचा आणि बैठकीच्या तयारीचा खर्च सार्वजानिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आलेला नाही. उद्घाटन सोहळा झाला नसला तरी मेडिकल, मेयो आणि दंत महाविद्यालयाच्या समस्यांबाबत लोकप्रतिनिधीसोबत गंभीर चर्चा झाली असल्याचे राज्याचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी सांगितले.