शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेचा परिणाम गुरुवारी ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीत, कळवा तसेच जिल्ह्य़ातील शहरी भागांमधील मुख्य रस्त्यांवर तसेच एरवी गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या रेल्वे स्थानकांवरही दिसून आला. भाउबीज, रक्षाबंधन यासारख्या सणांना ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी होते असा दरवर्षीचा अनुभव असतो. हे लक्षात घेउन मध्य रेल्वेने सुमारे ३० हजार अतिरिक्त तिकीट कूपन्स ठाणे स्थानकात विक्रीसाठी उपलब्ध करून दिली होती. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत प्रवाशांचा ओघ स्थानकात कमी होता, अशी माहिती स्थानकातील प्रशासकीय सूत्रांनी दिली. पूर्व-द्रुतगती महामार्गावरही वाहनांची संख्या बरीच कमी दिसत होती. काही ठिकाणी तर शुकशुकाट होता. एकीकडे हे चित्र दिसत असताना शिवसेनेचा गड समजल्या जाणाऱ्या ठाणे शहरातील दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होते.
बुधवारी रात्रीपासून शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीविषयी सुरू असलेल्या चर्चेमुळे मुंबईतील काही उपनगरांमध्ये दुकाने बंद ठेवण्यात आल्याचे चित्र होते. ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली यासारख्या शहरांमध्ये या चर्चेचा काहीसा परिणाम जाणवत होता. एरवी वाहनांच्या गर्दीमुळे गजबजून जाणारा पूर्व-द्रुतगती महामार्गावर काही ठिकाणी अक्षरश शुकशुकाट असल्यासारखे चित्र होते. घाटकोपरपासून पुढे ठाण्यापर्यंत महामार्गावर तुरळत वाहने दिसून येत होती. घोडबंदर मार्गावरही नेहमीप्रमाणे वाहने नव्हती. ठाणे-बेलापूर मार्गावरही वाहतूक मंदावल्याचे चित्र दिसत होते.
दरम्यान, शिवसेनेचा गड असणाऱ्या ठाणे शहरात या चर्चेचा दैनंदिन व्यवहारांवर फारसा परिणाम दिसून येत नव्हता. महामार्गावर पसरलेल्या शुकशुकाटामुळे ठाणे शहरातील व्यवहार ठप्प असतील, असा समज ठाणेकरांनी खोटा ठरविला. गोखले रोड, राम मारुती रोड यासारख्या गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या मार्गावरील दुकाने सुरू होती. एरवीच्या तुलनेत याठिकाणी कमी गर्दी दिसत असली तरी व्यवहार मात्र नियमीत सुरू होते. कळवा, खारेगाव या पट्टयात रस्त्यांवरही तुलनेने कमी गर्दी दिसत होती. ठाणे स्थानकात प्रवाशांची बऱ्यापैकी गर्दी होती. मात्र, एरवीच्या तुलनेत तिकीट विक्री कमी झाल्याची माहिती येथील सूत्रांनी दिली. भाऊबीज, रक्षाबंधन यासारख्या सणांना ठाणे स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी होते, असा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे यंदा मध्य रेल्वे प्रशासनाने ठाणे, कल्याण डोंबिवली स्थानकात जादा तिकीटे तसेच कूपन्स उपलब्ध करून दिली होती. दरवर्षीच्या तुलनेत प्रवाशांचा पुरेसा प्रतिसाद नव्हता, अशी माहिती रेल्वेतील प्रशासकीय सूत्रांनी दिली. सकाळच्या वेळेत तर याठिकाणी तिकीट खिडक्या ओस पडल्याचे चित्र होते. दुपार होताच रेल्वे स्थानकातील गर्दी वाढू लागल्याचे चित्र दिसत होते.