शहरातील अवैध वाहनतळ, अवैध प्रवासी वाहतूक, अवैध फलकबाजी तसेच राज्यमार्ग क्रमांक १४ वरील अतिक्रमण हटविण्यासाठी आ. साहेबराव पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर त्यांनी लाक्षणिक उपोषण केले.
अमळनेर-चोपडा रस्त्यावरील अतिक्रमण तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बेकायदेशीर वाहनधारकांविरुद्ध प्रभावी कारवाई करण्याचे आदेश असतानाही त्याची पूर्णपणे अंमलबजावणी होत नसल्याने आपण उपोषण सुरू केल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. ८ ऑगस्ट आणि १ ऑक्टोबर २०१३ या दिवशी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत वाहनतळासाठी निश्चित केलेल्या काही ठिकाणांवर प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी केली जात नाहीत. या संदर्भात आमदारांनी थेट स्थानिक पातळीपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्यानंतरही कार्यवाही न झाल्याने ९ ऑगस्ट, २३ सप्टेंबर, २ ऑक्टोबर रोजी उपोषण केले. तर हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी उपोषण केले होते, तरीही स्थानिक अधिकाऱ्यांकडून कोणतीच कारवाई न झाल्याने २६ जानेवारीला उपविभागीय अधिकारी दालनासमोर लाक्षणिक उपोषण केले. अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. या वेळी उपविभागीय अधिकारी तुकाराम हुळवळे, पालिका मुख्याधिकारी सोमनाथ शेटे, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, पंचायत समिती अध्यक्षा ललिता बैसाणे, तिलोत्तमा पाटील उपस्थित होते.