विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळण्याची शक्यता दिवसेंदिवस धूसर बनत चालल्याने शिवसेनेचे अनेक नगरसेवक सेनेला रामराम ठोकण्याच्या विचारात आहेत. त्यांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी मनसेने जोरदार प्रयत्न चालवले आहेत. मनसेच्या प्रयत्नांना भाजपही मूकपणे पण सक्रिय सहकार्य करीत आहे. निवडणुकीनंतरच्या राजकारणाचा विचार करून या हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे.
चार-पाच वेळा महापालिकेवर निवडून गेलेल्या नगरसेवकांना आता आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यासाठी त्यांनी आपापल्या ‘गॉडफादर’च्या मदतीने प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यात या वेळी महायुतीच सत्तेवर येणार, या अंदाजामुळे या वेळी काहीही झाले तरी उमेदवारी मिळवायचीच, असा निर्धार अनेकांनी केला आहे; परंतु उद्धव ठाकरे यांनी विद्यमान आमदारांनाच उमेदवारी देण्याचे सूतोवाच केल्यामुळे इच्छुक नगरसेवकांचे अवसान गळाले.
उमेदवारी मिळण्याची शक्यता नसलेले हे नाराज स्वाभाविकच ‘अन्यत्र’ पाहू लागले आहेत. ही संधी साधून मनसेच्या काही नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे. पक्षात येणार का, वरिष्ठांशी बोलतो, उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करतो, असे सांगून या नगरसेवकांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न मनसे नेते करीत आहेत.
आश्चर्य म्हणजे या नगरसेवकांशी भाजपही संपर्कात आहे. मुंबईत अनेक भागांत शिवसेनेचे प्राबल्य आहे. शिवसेनेचे अनेक बालेकिल्ले आजही भक्कम आहेत. विधानसभा निवडणुकीत मोदींची जादू कितपत चालेल याबाबत भाजप नेतेच साशंक आहेत. ‘ज्याचे आमदार अधिक त्याचा मुख्यमंत्री’ हे सूत्र असल्याने कोणत्याही परिस्थितीत आपले आमदार जास्त संख्येने निवडून आणण्याचा चंग भाजपने बांधला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाराज नगरसेवकांना पदांचे गाजर दाखविण्यास भाजपने सुरुवात केली आहे.
शिवसेनेच्या उमेदवाराला नगरसेवकाची रसद कमी झाली तर त्याचा निवडणुकीवर निश्चितच परिणाम होईल आणि शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्यास विधानसभेतील भाजपचे संख्याबळ वाढण्यातील अडसर दूर होईल, असा भाजपचा होरा आहे. भाजप उमेदवाराच्या मतदारसंघातील शिवसेना नगरसेवक इतर पक्षांत गेल्यास त्याचा भाजपला फटका बसू नये म्हणूनही या नगरसेवकांना भुलविण्यात येत आहे. मात्र काहींनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची मानसिकता बनविली असून त्याचा शिवसेनेलाच नव्हे तर भाजपलाही फटका बसण्याची शक्यता आहे.