गोंदिया-बालाघाट मार्गावरील अनधिकृतरित्या बांधलेल्या साई कॉम्प्लेक्सचे प्लॉट नं.१७३-२ नझुल सीट क्रमांक ४९- डी वरील बांधकामाचे बनावट कागदपत्राव्दारे फिर्यादींना विक्री करून २६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मनसे शहराध्यक्ष साकेत वामनराव शेंडे (३२) यांनी तक्रार केली असून, न्यायालयाच्या आदेशावरून रामनगर पोलिसांनी या कॉम्प्लेक्सचे मालक हरगुन हिरानंद गुरनानी, किशोर कन्हैयालाल तलरेजा व प्रवीण आपलदास मेघानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मनसे शहराध्यक्ष साकेत शेंडे यांनी त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे लक्षात आल्यावर रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर त्यांना पोलिसांनी कोर्टात जाण्यास सांगितले. त्यांनी कोर्टात प्रकरण सादर केले. याप्रकरणी नगर पालिकेकडून सादर करण्यात आलेल्या अहवालाप्रमाणे नगरपालिकेने मंजूर केलेल्या, तसेच गुरनानी यांनी ग्राहकांना दिलेल्या बोशरप्रमाणे बांधकाम न करता व्यक्तिगत लाभासाठी अतिक्रमण व ग्राहकांची दिशाभूल करून बांधकाम केले आहे. ज्यामुळे बेसमेंटमध्ये ४ ते ५ फूट पाणी साचून राहते व इमारत कमकुवत तयार झाली आहे. याच बेसमेंटमध्ये विद्युत मीटर लावलेले असल्याने कधीही अपघात होऊ शकतो. नकाशात तीन लिफ्ट, तीन रस्ते आहेत. मात्र, प्रत्यक्षात एकच लिफ्ट व एकच रस्ता आहे. दोन लिफ्टसाठी खोदलेल्या खड्डय़ात पाणी साचते व कधीही अपघात होऊ शकतो. कॉम्प्लेक्सच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर अनधिकृत बांधकाम करून ती एनमार्टला भाडय़ाने दिली आहे. ओपन व्हेंटीलेशनच्या जागेत अनधिकृत बांधकाम केले आहे. नकाशात ज्या ठिकाणी टॉयलेट, बाथरूम दाखविले आहे. त्याच ठिकाणी बांधकाम करून दुकाने तयार केली आहे. बेसमेंटमध्येही १२ फुटाचा खड्डा खोदून अनधिकृतपणे दुकाने काढली आहेत.
साकेत शेंडे यांच्या तक्रारीवरून कोर्टाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलीस विभाग व नगरपालिका या प्रकरणी काय करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई व ठाणेमधील अतिक्रमणाच्या प्रकरणानंतर राज्य शासनाने सर्व पालिकोंना अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश दिलेले असल्याने साई कॉम्प्लेक्सवरही कारवाई होणार काय, अशी चर्चा शहरात सुरू आहे.