वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीवेळी मराठी भाषकांना डावलून कर्नाटक विद्यापीठाचे पदवीधर असलेल्यांना नोकरीत सामावून घेण्याचा प्रकार मंगळवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला. प्रचंड घोषणाबाजी करत कागदपत्रे फाडून टाकली. निवड समितीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरताना धक्काबुक्कीही करण्यात आली. गोंधळ घालणाऱ्या मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह सात कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांची वैयक्तिक जामिनावर सायंकाळी सुटका केली.    
येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये मंगळवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी राज्यभरातील १६८ मराठी विद्यार्थ्यांनी निवड समितीकडे अर्ज केला होता. निवड प्रक्रिया सुरू झाल्यावर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना डावलून कर्नाटकातील विद्यापीठांचे प्रमाणपत्र मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने निवडले जात आहे, असे निदर्शनास आले. त्यावर संबंधित विद्यार्थ्यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष अभिजित साळोखे, शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, माजी जिल्हाध्यक्ष नवेझ मुल्ला, प्रसाद पाटील,अभिजित राऊत, अमित कातवरे, अभिजित पाटील आदींशी संपर्क साधला. सुमारे १०० हून अधिककार्यकर्त्यांसह मनसेचे पदाधिकारी निवड प्रक्रिया सुरू असलेल्या इस्पितळात दाखल झाले.    
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, यांच्यासह निवड समितीचे सदस्य निवड प्रक्रियेमध्ये मग्न होते. अशावेळी मनसेचे कार्यकर्ते पक्षाचे झेंडे घेऊन निवड प्रक्रियेच्या ठिकाणी घुसले. त्यांनी मराठी भाषक पदवीधर युवकांवर अन्याय होत असल्याबद्दल प्रचंड घोषणाबाजी सुरू केली. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना निवडीत डावलण्यात जात असल्याबद्दल निवड समितीच्या सदस्यांना धारेवर धरले. जाणीवपूर्वक मराठी युवकांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष अभिजित साळोखे यांनी केला.
निवड प्रक्रिया अयोग्य पद्धतीने चालली असल्याचा आरोप केल्यावर निवड समिती सदस्यांनी प्रक्रिया वैध असल्याचे सांगितले. त्यातून मनसेचे पदाधिकारी निवड समितीत शाब्दिक जुगलबंदी सुरू झाली. चिडलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी निवड भरतीसाठी जमविलेली कागदपत्रे फाडून टाकली. साहित्य विस्कटून टाकले. निवड समितीच्या सदस्यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की केली. त्यामुळे इस्पितळातील वातावरण तणावपूर्वक बनले होते.    
या प्रसंगाची माहिती कळल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी इस्पितळात दाखल झाले. त्यांच्यासमोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू करीत निवड प्रक्रिया बंद पाडली. या आंदोलनात मनसेचे १०० हून अधिक कार्यकर्ते तसेच मुलाखतीसाठी आलेले मराठी भाषक विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी जिल्हाध्यक्ष साळोखे, शहराध्यक्ष दिडोंर्ले यांच्या यांच्यासह सात जणांना अटक केली.