मराठी चित्रपटांमध्ये अलीकडे लग्न, प्रेम या विषयावर काही चित्रपट येत आहेत, काही आले आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये प्रेम हे मुख्य सूत्र धरून त्याभोवती चित्रपट गुंफलेला असतो. मराठीमध्ये कौटुंबिक, सामाजिक, विनोदी अशा स्वरूपाचे चित्रपट अधिक येतात. त्यामध्ये ‘प्रेमसूत्र’ हा चित्रपट वेगळा ठरावा. प्रेम याच विषयाभोवती गुंफलेला असला तरी त्याला आजच्या आधुनिक काळाचे संदर्भ आहेत. खरे तर रूढ प्रेमकथापटाला फाटा देऊन अनोख्या पद्धतीने उलगडत जाणारी किंवा अपघाताने घडलेली प्रेमकथा आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. प्रेक्षकाला पटेल किंवा पटणारही नाही, परंतु वेगळा दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. काहीशी धाडसी वाटेल अशी प्रेमकथा असली तरी असेही घडू शकते हेही प्रेक्षकाला पटवून देणारा चित्रपट आहे.
करिअर घडविताना मराठी तरुण-तरुणी लग्न-प्रेम या गोष्टींना दुय्यम महत्त्व देताना आपण अवतीभवती पाहतोय. कुठल्याही महत्त्वाकांक्षी तरुण-तरुणीला करिअर फर्स्ट असे वाटणे काळाला अनुसरून आहे. पण मागची पिढी वेळच्या वेळी लग्न व्हावे, मुले व्हावीत, आमचे नाही का सगळे सुरळीत झाले असे म्हणणारी असताना अनेकदा तरुणांना आई-वडिलांचे ऐकावे लागते. परंतु, करिअर चांगले झाले तर पैसा-प्रतिष्ठा आणि मग आपल्या मनासारखे करता येईल असे वाटणे हेही स्वाभाविकच. आनंद जोशी (संदीप कुलकर्णी) हाही करिअरला महत्त्व देणारा तरूण आहे. कॉपरेरेट कंपनीत मोठय़ा हुद्दय़ावर त्याला पोहोचायचे आहे. परंतु, गोव्याला कंपनीच्या कामासाठी गेला असताना सानिया (पल्लवी सुभाष) सोबत त्याची अचानक भेट होते, ओळख होते. त्याच रात्री दोघे एकत्र राहतात. ‘वन नाईट स्टॅण्ड’ केल्यानंतर सानिया निघून जाते. मग लगेच आनंद-सानिया यांची भेट होत नाही. गोव्याच्या ‘टिपिकल’ कॅथॉलिक कुटुंबात वाढलेली स्वच्छंदी सानिया प्रियकराच्या शोधात असते. तिचा बालमित्र पीटर याच्याशी तिला लग्न करायचे नसते. आनंदच्या रूपाने सानियाला तिच्या मनातला तरूण भेटतो खरा; परंतु, लगेच ती आपल्या भावना त्याच्यापाशी व्यक्त करीत नाही. आनंद ज्या कंपनीत मॅनेजर आहे त्या कंपनीच्या मालकाची मुलगी मालविका (श्रुती मराठे) हिला आनंदविषयी आकर्षण आहे, त्यालाच ती प्रेम मानते. सुजित हा आनंदसारखाच त्याचा महत्त्वाकांक्षी आहे, त्यांची मैत्रीही आहे. आनंदला मिळविण्यासाठी काहीही करण्याची मालविकाची तयारी आहे. परंतु, तिला तो मिळतो का, आनंदला खरे प्रेम सानियाचे की मालविकाचे हे समजते का याभोवती सिनेमाचे कथानक फिरते.  लग्न आणि प्रेम या दोन्ही गोष्टींना फारसे महत्त्व न देणारा करिअरिस्ट आनंदचे व्यक्तिमत्व संवादातून उलगडते. संदीप कुलकर्णीने साकारलेला आनंद हा त्याच्या आतापर्यंतच्या व्यक्तिरेखांपेक्षा वेगळा आहे. राधा ही बावरी मालिकेतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकारणाऱ्या श्रुती मराठेने मालविका व्यक्तिरेखेच्या छटा चांगल्या दाखविल्या आहेत. परंतु, ही व्यक्तिरेखा मध्यांतरानंतर सरधोपट मार्गाने जाते हे काहीसे खटकते. गोव्याच्या निसर्गसुंदर चित्रणाबरोबरच सानियाची व्यक्तिरेखा पल्लवी सुभाषने सहज साकारली आहे. प्रेमकथेला अधिक रंजक करणारे संगीत ही बाजूही चांगली जमली आहे. गोव्याचे नेत्रसुखद चित्रण आणि नेहमीपेक्षा वेगळ्या स्थळांचे दर्शन पुष्पांक गावडे यांनी चांगले घडविले आहे. लेखक-दिग्दर्शकांनी आधुनिक जगातील प्रेमकथेचा नवा कोन मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो काही प्रमाणात यशस्वीही झाला आहे असे म्हणता येईल.
प्रेमसूत्र
निर्माते – विश्वास जोशी, राजाराम परमार, संकल्पना – संदीप कुलकर्णी, दिग्दर्शक – तेजस विजय देऊस्कर, छायालेखक – पुष्पांक गावडे, कथा-पटकथा – प्रसाद मिरासदार, तेजस देऊस्कर संवाद – महेंद्र तेरेदेसाई, संकलन – अपूर्वा मोतीवाले, आशिष म्हात्रे, संगीत – सुस्मित लिमये, कलावंत – संदीप कुलकर्णी, पल्लवी, सुभाष, श्रुती मराठे, शिशिर शर्मा, लोकेश गुप्ते, प्रसाद पंडित, शुभा, खोटे, इला भाटे, प्रदीप आठवले, मीनाक्षी मार्टिन्स व अन्य.