*  पाचवी महालोकअदालत उद्या
*  प्रकरणे हाताळण्यासाठी ९४ पॅनल्स
नागपूर जिल्ह्य़ात ५० हजार, ६१७ दिवाणी दावे व एक लाख, ५४ हजार, ९४० फौजदारी प्रकरणे अशी एकूण २ लाख, ५ हजार, ५५७ प्रकरणे प्रलंबित आहेत. महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण, मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखालील नागपूर जिल्हा विधि सेवा प्राधिकरणच्या वतीने पाचवी महा लोकअदालत ३ मार्चला नागपूर जिल्ह्य़ात आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील सर्व न्यायालये, शाळा न्यायाधिकरण, मोटार अपघात दावा प्राधिकरण आदी ठिकाणी एकाच दिवशी महालोकअदालत राहणार आहे.
रविवारी सकाळी ९.३० वाजता महालोकअदालतीची सुरुवात होणार आहे. यात दिवाणी दावे, भूसंपादन संबंधीची प्रकरणे, तडजोड योग्य फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक वादासंबंधीची प्रकरणे आदी प्रकरणे सामंजस्याने तडजोडीसाठी महालोकअदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. मुख्य जिल्हा न्यायाधीश सुभाष मोहोड यांच्या नेतृत्वाखाली न्यायाधीश, सरकारी अधिवक्ता, प्रशिक्षित मध्यस्थ, वकील, कर्मचारी आणि जिल्हा विधि सेवा प्राधिकरण प्रकरणे निकालात काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जिल्हा न्यायालयाच्या तळमजल्यावर माहिती केंद्र सुरू करण्यात आले असून त्या ठिकाणी लोक महाअदालतीची माहिती संबंधितांना मिळू शकेल तसेत माहिती दर्शविणारा लघुपट दाखविण्यात येत आहे.
 या लोकअदालतीमध्ये १५ हजार, ४५४ प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत तसेच महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या सहकार्याने वादपूर्व फौजदारी वादाची १० हजार, ४४५ व दिवाणी स्वरूपाच्या वादाची ३ हजार, ३१ अशी एकूण १३ हजार, ४७६ वादपूर्व प्रकरणे महालोकअदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा विधि प्राधिकरणाचे सचिव किशोर जयस्वाल यांनी महालोकअदालतीच्या दिवशी सुमारे २८ हजार ९३० प्रकरणे हाताळण्यासाठी एकूण ९४ पॅनल्स नेमले आहेत. अधिक माहितीसाठी संबंधितांनी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात ०७१२-२५४१०६२ , ७५८८५१३५४५ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन किशोर जयस्वाल यांनी केले.