मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेगाडय़ांच्या मोटरमनमध्ये सध्या मध्य रेल्वे प्रशासनाबाबत प्रचंड असंतोष आहे. मध्य रेल्वेमार्गावर दिवसाला १२०० फेऱ्या चालवणाऱ्या मोटरमनना मिळणारा डय़ुटीआधीचा तयारीचा काळ अर्धा तास कायम ठेवण्यात यावा, या मागणीसाठी केलेले आंदोलन यशस्वी झाले असले, तरी प्रशासनाच्या लबाडीमुळे मोटरमन संतप्त आहेत.
मध्य रेल्वेवर मोटरमनला आपली फेरी सुरू करण्याआधी काही वेळ ‘तयारी वेळ’ म्हणून देण्यात येतो. हा कालावधी पूर्वी २० मिनिटे होता. मात्र तेव्हा गाडय़ा ६ डब्यांच्या असत. त्यानंतर ९ डबा गाडय़ा धावायला लागल्या. नंतर डब्यांची संख्या वाढून ती १२ आणि आता १५ झाली. मात्र तरीही ‘तयारी कालावधी’ २० मिनिटेच होता. या वर्षी मोटरमननी आंदोलन करून हा कालावधी ३० मिनिटांचा करून घेतला. त्याला प्रशासनानेही मान्यता दिली होती, असे ‘एनआरएमयू’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मोटरमनसाठी छापण्यात येणाऱ्या मार्गदर्शक पुस्तकांतही ही वेळ ३० मिनिटेच दाखवली होती.
मात्र, ही वेळ पुन्हा २० मिनिटेच करण्यात यावी, असा निर्णय काही दिवसांपूर्वी वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक कमल जैन यांनी घेतला. त्यामुळे मोटरमनमध्ये असंतोषाची भावना होती. मोटरमनना ओव्हरटाइम हवा असल्याने ते तयारी कालावधी ३० मिनिटांचा करण्याची मागणी करतात, असा आक्षेपही प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे मोटरमन अधिकच संतप्त झाले होते.
या संतापाला अखेर १८ सप्टेंबरच्या अनंतचतुर्दशीच्या ‘मुहूर्ता’वर वाचा फुटली. त्या दिवशी मोटरमननी ‘काम बंद’ आंदोलनाचा बडगा उगारला. रेल्वे प्रशासनानेही नमते घेत ‘तयारी कालावधी’ ३० मिनिटेच ठेवण्याचे कबूल केले. त्यामुळे हा प्रश्न तात्पुरता सुटल्यासारखा वाटत आहे. मात्र याबाबत एनआरएमयूचे अधिकारी आणि काही मोटरमन यांच्याशी बोलले असता, प्रशासनाच्या या दुटप्पी वागणुकीबद्दल त्यांच्या मनात असंतोषाची भावना असल्याचे जाणवते. मोटरमनला आपले काम व्यवस्थित करण्यासाठी हा तयारी कालावधी आवश्यक असतो. वाढती गर्दी, प्लॅटफॉर्मची वाढती लांबी यांचा विचार करून मोटरमनला लोकलच्या केबिनपर्यंत पोहोचायलाच सुमारे १० मिनिटे लागतात. त्यामुळे २० मिनिटांची ही तयारी वेळ आमच्यावर अन्याय करणारीच होती, अशी भावना काही मोटरमननी बोलून दाखवली. प्रवाशांना वेठीस धरणे आम्हालाही पसंत नाही. मात्र अशी कडक पावले उचलल्याशिवाय प्रशासनही आमच्या प्रश्नांची दखल घेत नाही, असे एनआरएमयूच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
तयारी कालावधी कशासाठी?
मोटरमनसाठीच्या नियमावलीनुसार गाडीचा ताबा घेण्याआधी त्यांना काही दैनंदिन सोपस्कार पार पाडावे लागतात. यात दर दिवशी मार्गावर काय परिस्थिती आहे, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा, रूळ यांत कुठे बिघाड आहे का, याचा आढावा त्यांना घ्यावा लागतो. मार्गावर कुठे कामे सुरू आहेत, काही अडथळे आहेत याचा तक्ता अभ्यासावा लागतो. त्यानंतर लोकलच्या केबिनपर्यंत चालत जावे लागते. केबिनमध्ये गेल्यानंतरही मोटरमनना गाडीची स्थिती तपासावी लागते. तसेच नियमावलीनुसार त्यांनी काही काळ शांत बसून शांतचित्तानेच प्रवास सुरू करणे अपेक्षित असते. या साऱ्यासाठी लागणाऱ्या वेळाला ‘तयारी कालावधी’ म्हणतात.