‘इंग्लिश विंग्लिश’ या तिच्या पहिल्याच चित्रपटाने विजयपताका रोवली आहे. श्रीदेवीसारख्या दमदार अभिनेत्रीने पुनरागमनासाठी तिचा चित्रपट निवडावा, यातच सर्व काही आले. सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असलेल्या गौरी शिंदे या नवोदित दिग्दर्शिकेने ‘रविवार वृत्तान्त’शी दिलखुलास गप्पा मारल्या. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ज्या प्रकारचे चित्रपट निर्माण होत आहेत, त्यावरून आपण क्रांतीच्या उंबरठय़ावर असल्याचे मतही तिने व्यक्त केले..
० करिअर म्हणून दिग्दर्शनाची निवड का आणि कशी करावीशी वाटली?
– मुळात मला जाहिरात निर्मिती क्षेत्रात प्रचंड रस आहे. त्या क्षेत्रात माझ्या नावावर जवळपास शंभर जाहिरातीही जमा आहेत. मात्र तीस सेकंद किंवा एक मिनिटाच्या जाहिराती करीत असताना तीन तासांचा चित्रपट करण्याचा विश्वास नव्हता. त्यासाठी मग न्यूयॉर्कमध्ये एक अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर पुन्हा काही काळ जाहिरात क्षेत्रात घालवला. जाहिरात करतानाच दिग्दर्शनाच्या अनेक अंगांची ओळख होत होती. त्यात रस वाढत गेला. मग आपल्या मनातली गोष्ट पडद्यावर का मांडू नये, असा विचार डोक्यात आला. म्हणून मग हा ‘इंग्लिश विंग्लिश’चा घाट!
० मनातल्या गोष्टीवरून, ‘इंग्लिश विंग्लिश’ची गोष्ट नेमकी तुला सुचली कुठून? तुझ्या आईच्या गोष्टीवरून ती सुचली, हे खरं आहे का?
– खरं सांगू का, माझी आई, हे केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. पण आज जगात, भारतात अशा अनेक आई आहेत की, ज्यांना आत्मविश्वासाचा अभाव सतत सतावत असतो. त्यातच आपल्या देशात इंग्रजी न येणारा माणूस हद्दपार वगैरे ठरण्याचीही शक्यता असते. घरीच ही गोष्ट तयार होती. त्यात अनेक भावनांची सरमिसळ होतीच. मग तोच विषय नक्की केला. आता चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता मी अनेकांच्या मनातला विषयच पडद्यावर मांडला, याचं समाधान मिळतंय.
० तुझा पहिला चित्रपट कसा असावा, याबाबत काही संकल्पना डोक्यात होती का? पहिल्या चित्रपटासाठी श्रीदेवी डोळ्यासमोर होती का?
– छे, छे! अजिबातच नाही. उलट पहिला चित्रपट एवढय़ा मोठय़ा स्वरूपात आकाराला येईल, असं वाटलंच नव्हतं. श्रीदेवीचं विचाराल, तर ती सगळ्यात शेवटच्या टप्प्यात आमच्यात सहभागी झाली. ती एकदा सहज भेटली असताना मी तिला माझं कथानक ऐकवलं. तिच्या कमबॅकसाठी ते तिला योग्य वाटलं. पण पहिल्या चित्रपटाचं एवढं जोरदार प्लॅनिंग नक्कीच केलं नव्हतं.
० मग आर. बल्की तुझ्या आयुष्यात येण्याबाबत पण असंच म्हणता येईल का?
– (स्मित हास्य करीत) नशिबाने तुमच्यासाठी काहीतरी खास नक्कीच ठेवलेलं असतं. ते तुम्हाला योग्य वेळी आणि योग्य स्वरूपातच मिळतं. बल्की माझ्या आयुष्यात आला, तो माझ्या आयुष्यातला सर्वात उत्तम ग्रहयोग म्हणता येईल.
० तुम्ही दोघेही दिग्दर्शक आहात. पण तुझ्या मते, तुझ्या आणि त्याच्या दिग्दर्शन शैलीत साम्य आणि फरक काय?
– आमच्या शैलीत साम्य फारसं नसलं, तरीही आम्हा दोघांसाठीही कथानक, संहिता ही खूप महत्त्वाची आहे. आम्ही दोघे संहितेच्या बाबतीत खूप चोखंदळ असतो. चित्रपटाची गोष्ट लोकांना भिडली पाहिजे, लोकांना त्यात रस वाटला पाहिजे आणि त्या कथेने लोकांचं मनोरंजन केलं पाहिजे, याकडे आमचं लक्ष असतं. त्याचबरोबर आणखी एक साम्य म्हणजे आम्हा दोघांचा संवेदनशीलपणा! पण ही साम्यस्थळं वगळता आम्हा दोघांच्या शैलीत कमालीची भिन्नता आहे. प्रत्येक दिग्दर्शकाची शैली भिन्न असते. ती तशी भिन्न असते, म्हणूनच तर प्रत्येक चित्रपट एक वेगळा अनुभव देतो ना?
० प्रादेशिक चित्रपटांच्या तुलनेत हिंदी चित्रपटसृष्टीत महिला दिग्दर्शक कमी आहेत. याचं कारण काय? आणि या क्षेत्रात महिला दिग्दर्शकांसमोर आव्हाने काय आहेत?
– केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतच नाही, तर अनेक क्षेत्रांत महिलांचं प्रमाण कमी आहे. हा पुरुषसत्ताक समाजाचा प्रभाव असावा. मी काही टोकाची स्त्रीवादी नाही. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे यायला हवं, आणि त्या तशा येत आहेत. दिग्दर्शन सोडून चित्रपटाच्या इतर आघाडय़ांवर महिलांचं प्रमाण लक्षणीय आहे. आव्हानं प्रत्येक क्षेत्रात आहेतच. पण सर्वात मोठं आव्हान म्हणजे तुमच्या कामावर तुमची निष्ठा असायला हवी. या क्षेत्रात एवढी प्रलोभनं आहेत की, त्यांच्यापासून तुम्हाला जपून राहायला हवं. हे पथ्य पाळलं की, इतर आव्हानं पेलण्याचं बळ आपोआपच मिळतं.
० दिग्दर्शकाच्या बाहेरच्या भूमिकेतील गौरी कशी आहे?
– ती आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करणारी आहे. हे एक वर्ष मी आणि बल्की आम्हा दोघांसाठीही खूपच खडतर होतं. आम्ही या काळात क्वचितच एकमेकांना भेटलो. पण आता तो सर्व वेळ भरून काढायचा आहे. मला माझ्या कुटुंबीयांसह वेळ घालवायला खूप आवडते. मोकळा वेळ मिळाला की, माझे जवळचे मित्र आणि कुटुंबीयांना वेळ देते.
० तुझे छंद कोणकोणते आहेत?
– पर्यटन.. मी दिग्दर्शनाकडे वळले नसते, तर कदाचित एखादा ट्रॅव्हल शो केला असता. मला दिग्दर्शन आणि चित्रपटांएवढीच पर्यटनाची आवड आहे. त्याचप्रमाणे मला लेखन करायला खूप आवडतं.  मला चित्र काढण्याचाही छंद आहे.
० मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचा विचार आहे का?
– आता तरी माझी तेवढी योग्यता आहे, असं मला वाटत नाही.
० हा तुझा विनय म्हणायचा की..?
– विनय वगैरे अजिबात नाही. मराठी चित्रपटसृष्टी आता एका उत्कृष्ट काळातून जात आहे. मराठी चित्रपटांच्या संक्रमणाचा हा काळ आहे. उमेश कुलकर्णी, सुजय डहाके, परेश मोकाशी, गजेंद्र अहिरे वगैरे सगळेच दिग्दर्शक जोमाने कामाला लागले आहेत. त्यांच्या विषयांमधील प्रगल्भता, आशयघनता पाहून मला त्यांचा अभिमान वाटतो आणि एवढय़ा कमी अनुभवाच्या जोरावर एवढय़ा मोठय़ा दिग्दर्शकांच्या तोडीचं काम माझ्याकडून होणे आता तरी शक्य नाही. पुढे नक्कीच विचार करेन.
० तुझा विक पॉइंट कोणता?
– माझा भाचा हा माझा विक पॉइंट आहे आणि स्ट्राँग पॉइंटही! त्याला जरा दुखलंखुपलं की, मला सहन होत नाही. भावनिक पातळीवरून भौतिक पातळीकडे झुकलं, तर खाणं हा माझा प्रचंड विक पॉइंट आहे. मी कधीही, कुठेही आणि काहीही खाऊ शकते. सगळ्याच प्रकारचं फूड मला आवडतं. त्यातही मासे हा माझा खास विक पॉइंट.