* पोलिसांकडून मात्र अद्यापही कारवाई नाही
*  रेल्वे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचीच तक्रार
मुंबई सेंट्रलच्या बेस किचनमधील खाद्यपदार्थ राजधानी, दुरान्तो अशा विशेष गाडय़ांपर्यंत घेऊन जाणारी बॅटरीवर चालणारी छोटी चारचाकी गाडी सोमवारी चक्क नायर रुग्णालयाच्या बाहेर आढळली. ही गाडी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र त्रिवेदी यांना दिसली. त्यांनी या गाडीवरील दोघांनाही हटकले. मात्र ही गाडी शहर पोलिसांच्या हद्दीत असल्याने त्यांनी याबाबत आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुळात ही गाडी रेल्वे स्थानकाच्या परिसरातून बाहेर का आणि कशी गेली, हाच मोठा प्रश्न आहे. तसेच हा प्रकार पहिल्यांदाच झाला की, अशा प्रकारे खाद्यपदार्थाची गाडी सर्रास बाहेर जाते, याबाबतही चौकशी होण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.
रेल्वेने आपल्या स्थानकांच्या परिसरात बेस किचन स्थापन करून प्रवाशांना वाजवी दरात उत्तम खाद्यपदार्थ मिळतील, याची सोय केली आहे. या बेस किचनमधील खाद्यपदार्थ राजधानी, दुरांतो अशा खास गाडय़ांमध्ये पुरवले जातात.
खाद्यपदार्थ बेस किचनपासून संबंधित गाडीपर्यंत पोहोचवण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या ‘गोल्फ कार्ट’ची मदत घेतली जाते. ही गाडी रेल्वे परिसराच्या बाहेर जाणे अपेक्षित नसते. मात्र सोमवारी सकाळी ही गाडी नायर रुग्णालयाच्या बाहेर उभी असल्याचे आपल्याला आढळले.
गाडीत विनायक गावडे आणि अनिकेत भालेराव हे दोघे होते. तसेच गाडीत सँडविच वगैरे खाद्यपदार्थ असल्याचेही आढळले. आपण गावडे आणि भालेराव यांना हटकले असता, गाडीच्या चाकांमध्ये हवा भरायची असल्याने आपण बाहेर आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ही गाडी रेल्वे परिसराच्या बाहेर खाद्यपदार्थासकट येणे ही गंभीर बाब आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले.
तसेच गाडी शहर पोलिसांच्या हद्दीत असल्याने आपल्याला कारवाईचे काहीच अधिकार नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
परिणामी त्रिवेदी यांनी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वीजेवर चालणाऱ्या गाडय़ांना कागदपत्रे किंवा नंबर प्लेटची गरज नसते.
मात्र त्रिवेदी यांच्या तक्रारीची दखल घेत आम्ही प्रादेशिक परिवहन कार्यालयाला पत्र पाठवले आहे, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त मधुकर पाण्डे यांनी स्पष्ट केले. तसेच याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत् चंद्रायन यांना विचारले असता, या खानपान सेवेचे कंत्राट दिले जात असून त्यात रेल्वेचा थेट संबंध येत नाही. तसेच गाडी रेल्वे परिसराच्या बाहेर गेली असल्यास त्याबाबत रेल्वे पोलिसांनी कारवाई करायला हवी, असे त्यांनी सांगितले.
मात्र रेल्वेच्या गाडय़ांमध्ये खाद्यपदार्थ पोहोचवणारी गाडी खाद्यपदार्थासकट एका रुग्णालयाबाहेर दिसल्याने प्रवाशांमध्ये संशयाचे वातावरण आहे. हे खाद्यपदार्थ बाहेर नेण्याचे कारण काय, बाहेर या पदार्थाची विक्री केली जाते का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.