शहरात पाणी साठल्यामुळे नागरिकांचा रोष ओढवून घेतलेल्या पालिकेने मलेरिया, डेंग्यू व साथीच्या इतर आजारांबाबत मात्र कडक धोरण अवलंबले आहे. मुसळधार पाऊस पडून गेल्यानंतर डासांची संख्या अचानक वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व वॉर्ड अधिकारी, आरोग्य अधिकारी व कीटक नियंत्रण विभाग अधिकाऱ्यांना अ‍ॅलर्ट राहण्याची सूचना गुरुवारी अतिरिक्त आयुक्तांकडून देण्यात आली.
पाच वर्षांपूर्वी, २०१० मध्ये मलेरियाचा उद्रेक झाल्यानंतर पालिकेने सर्वच साथीचे आजार तसेच डासांचे नियंत्रण करण्यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गेली चार वर्षे मलेरियाचे प्रमाण कमी होत गेले. मात्र गेल्या वर्षी पावसानंतर लांबलेल्या हिवाळ्यात डेंग्यू व स्वाइन फ्लूची साथ वाढल्यावर पालिकेच्या आरोग्य विभागावर ताण आला. या पाश्र्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी गुरुवारी सर्व संबंधित विभागांकडून संपूर्ण शहराची माहिती घेतली. सध्या डासांची उत्पत्तीस्थाने तसेच मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाणही मर्यादित असल्याचे कीटक नियंत्रण विभाग तसेच आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मुसळधार पावसात डासांची अंडी वाहून जातात. मात्र पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर डास वाढतात असा दरवर्षीचा अनुभव आहे.
शहरातील पावसाचा जोर कमी झाल्याने साठलेल्या पाण्यातून डासांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कीटकनाशक विभागाच्या वॉर्ड पातळीवरील कर्मचाऱ्यांना सावधान राहण्याची सूचना करण्यात आली. मलेरियाच्या रुग्णांचे जूनमधील प्रमाण फार नसले तरी पाच ते सहा वर्षांनंतर मलेरियाचा जोर वाढतो, असे जगभरात दिसून आलेले आहे. त्यामुळे २०१० मधील मलेरियाच्या उद्रेकानंतर आता पालिका प्रशासन अधिक सजगतेने प्रतिबंधात्मक उपाय करत आहे.