गुणपत्रिकेवर एकदा ‘नापास’चा शिक्का बसला तो ‘फिका’ करण्यासाठी पुनर्मुल्यांकनाची सोय मुंबई विद्यापीठाने उपलब्ध करून दिली खरी. पण, सध्या पुनर्मुल्यांकनाचे निकाल ‘लावताना’ विद्यापीठाचा परीक्षा विभाग इतके घोळ करतो आहे की ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असे म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. नुकताच या प्रकाराचा झटका डोंबिवलीतील एका अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांला बसला.
हा विद्यार्थी शेलू येथील ‘आचार्य अभियांत्रिकी महाविद्यालया’त पदवीच्या पहिल्या वर्षांला शिकतो. त्याचा पहिल्या सत्राचा निकाल जाहीर झाला तेव्हा गणिताबरोबरच मेकॅनिक्स या विषयातही नापासची लाल रेघ बघून त्याला आश्चर्य वाटले. गणिताचा पेपर कठीण गेल्याने त्यात आपण अनुत्तीर्ण होऊ, याची खात्री या विद्यार्थ्यांला होती. पण, मेकॅनिक्सचा पेपर नापास होण्याइतपत कठीण गेला नव्हता. दोनदोन विषयाच्या केटीच्या परीक्षांचा भरुदड नको म्हणून त्याने मेकॅनिक्सच्या पुनर्मुल्यांकनासाठी परीक्षा विभागाकडे अर्ज केला.
त्याचा पुनर्मुल्यांकनाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पण, मेकॅनिक्ससाठी अर्ज करूनही या विषयाचे पुनर्मुल्यांकन विद्यापीठाने केलेलेच नाही. त्याऐवजी परीक्षा विभागाने गणिताच्या पेपरचे पुनर्मुल्यांकन करून त्या विषयाचा निकाल जाहीर केला आहे. ‘हा प्रकार ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ म्हणायला हवा,’ अशी प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांच्या पालकांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे गणितात या विद्यार्थ्यांला १३ गुण देण्यात आले होते. ते वाढून १८ झाले आहे इतकेच. हा फरकही तब्बल पाच गुणांचा. रात्रभर जागून, मान मोडून अभ्यास करून पेपर लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन काय दर्जाचे आहे, याचा अंदाज यावरून यावा. आता या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्या आधी निकाल जाहीर झाला नाही तर त्याला गणित आणि मेकॅनिक्स या दोन्ही परीक्षांना बसावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतरही गोंधळ
फोटोकॉपी व पुनर्मुल्यांकनाबाबत काही तक्रार असल्यास त्या संदर्भात परीक्षा विभागाकडे तक्रारी दाखल करण्यास विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते. त्यानुसार दाखल झालेल्या तक्रारीची दखल घेऊन त्यापैकी काही विद्यार्थ्यांचे त्यांचे सुधारित निकाल परीक्षा विभागाने नुकतेच जाहीर केले. पण, हे निकाल जाहीर करतानाही विद्यापीठाने गोंधळ घालून ठेवला आहे. उदाहरणार्थ अभियांत्रिकीच्या माहिती-तंत्रज्ञान शाखेच्या (सातवे सत्र) एका विद्यार्थ्यांला ‘डीएसआयटी’ या विषयात दोन रकान्यात ६० आणि ६२ असे वेगवेगळे गुण दाखविण्यात आले आहेत. त्यापैकी कोणते गुण आपले मानायचे असा प्रश्न या विद्यार्थ्यांला पडला आहे. (पाहा सोबतचा विद्यार्थ्यांच्या तक्रारीचा अहवाल) इलेक्ट्रॉनिकच्या ८४५३ हा बैठक क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांलाही डीआयपीडी या विषयात ६४ आणि ६९ असे दोन वेगवेगळे गुण देण्यात आले आहेत.

प्रशासक नेमा
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सुरू असलेला हा गोंधळ नवीन नसून गेले चार-पाच वर्षे सुरू आहे. यंदा तर गोंधळाने कहरच केला आहे. यात लाखो विद्यार्थी भरडले जात असून त्यांच्या समस्या सोडविण्यास विद्यापीठ प्रशासन असमर्थ ठरले आहे. म्हणून परीक्षा विभागात आयएएस दर्जाचा अधिकारी प्रशासक म्हणून नेमण्यात यावा, अशी मागणी आम्ही विद्यापीठाचे कुलपती व राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याकडे करणार आहोत.
सुधाकर तांबोळी,
अधिसभा सदस्य, मनविसे