शतकभरातील विक्रमी तापमान नोंदीबरोबरच वाढलेल्या उष्म्याने सध्या मुंबईकर हैराण आहेत. या उन्हाने केवळ घामाच्या धारा लागत नसून त्याने विविध रोगांना आमंत्रणही दिले आहे. त्यामुळे ‘तब्येत सांभाळा’ असे प्रत्येकाने स्वत:लाच सांगण्याची वेळ आली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षेइतका पाऊस झाला नाही. अद्याप पावसाळ्याचा मोसम संपायचा असतानाच गेल्या चार दिवसांपासून मुंबईचे तापमान वाढले आहे. वाढलेल्या तापमानाने सगळ्यांना त्रस्त करून सोडले आहे. घामाचा त्रास सोसत आपली दैनंदिन कामे करताना चाकरमानी आणि श्रमाची कामे करणाऱ्या मजुरांची दैना होत आहे. उन्हाचा त्रास होतो म्हणून काही थंड खावे-प्यावे, तर त्यातून सर्दी- खोकला उद्भवतो आहे. भरीस भर डोळ्यांची साथ पसरत असल्याने त्यापासूनही स्वत:चा बचाव करणे आवश्यक झाले आहे.
पावसाळा थांबून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे यापूर्वी जमिनीत साठलेल्या पाण्याची वाफ होऊन वातावरणातील दमटपणा वाढला आहे. गरम आणि दमट हवेच्या वातावरणात जंतूंची पैदास सहज होऊ शकते. त्यामुळे विविध प्रकारचे संसर्गजन्य रोग झपाटय़ाने पसरतात. उष्मा जाणवला, की साहजिकच आईस्क्रीमसारखे थंड पदार्थ खाणे किंवा कोपऱ्या-कोपऱ्यावर सहजी उपलब्ध असलेली नाना प्रकारची थंड पेये पिणे अशा उपायाने उन्हापासून होणारा त्रास कमी करण्याचा सर्वाचाच प्रयत्न असतो. मात्र, अशारीतीने शरीराचे सामान्य तापमान झपाटय़ाने कमी करण्याचा प्रयत्न प्रत्येकाच्या प्रकृतीला झेपतोच, असे नाही. त्यातून घशाचा संसर्ग (थ्रोट इन्फेक्शन), पोट बिघडणे अशा तक्रारी उद्भवतात.
शरीरात विविध जंतू मुक्कामाला असतातच. एखाद्याने अतिथंड पेय प्यायल्यानंतर हे संधिसाधू जंतू हल्ला करतात. आम्लपित्ताचा त्रासही नेहमीचाच झाल्याने आम्ल घशापर्यंत येत असते. अशाप्रकारे संसर्ग आणि प्रदूषणामुळे घशाचा भाग कायम संवेदनशील असतो आणि कुठल्याही घातक बदलामुळे संसर्गाचे प्रमाण वाढते. सध्याच्या काळात कामाचे स्वरूप (वर्क कल्चर)ही बदललेले आहे. एखाद्या संसर्गाने कुणी आजारी असला, तरी कामाच्या अथवा ‘टार्गेट’च्या दडपणामुळे कार्यालयात जावेच लागते.
परिणामी डोळे आलेल्या, सर्दी-खोकला झालेल्या व्यक्तीपासून इतरांनाही संसर्ग होतो. हाच संसर्ग सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांद्वारे सार्वजनिक ठिकाणीही पसरतो. बहुतेक कार्यालयांमध्ये वातानुकूलन यंत्रे असल्यामुळे हवा खेळती राहण्यास वाव नसतो. परिणामी संसर्ग सहजी पसरतो.
सकाळी लवकर घराबाहेर पडणे व रात्री उशिरा परत येणे अशा चक्रामुळे व्यायामाला वेळ नाही, बाहेर खाणे-पिणे, तेही बहुतांश जंक फूड, झोपेचा अभाव इत्यादि कारणांमुळे आज एकूणच प्रत्येक व्यक्तीची प्रतिकारक्षमता कमी झाली आहे. त्यामुळे अशा वातावरणात व्यक्ती रोगाला चटकन बळी पडते. वेळेवर जेवण, व्यायाम आणि पुरेशी झोप याचे चक्र सांभाळले, तरच प्रत्येकाला स्वास्थ्य चांगले राखणे शक्य आहे.
सध्याच्या वातावरणात थंडपेये, तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावे; शरीरातून घाम जास्त जात असल्यामुळे पाणी जास्त प्यावे, त्यातही नारळपाणी हे तर शरीराला अतिशय उपयुक्त आहे. प्रतिकारशक्ती कमी झालेली आणि संसर्गजन्य रोग पसरण्याची शक्यता वाढलेली, अशा परिस्थितीत स्वत:चे आरोग्य सांभाळण्यासाठी विशेष काळजी घ्यायला हवी, असे मत डॉ. सुहास साठे यांनी व्यक्त केले.