व्हीप जारी करताना कार्यकर्त्यांवर गुन्हा
पक्षाचा व्हीप सहलीस गेलेल्या नगरसेवकांच्या घरावर डकवताना नगरसेवक अक्रमखान पठाण यांचे बंधू असलमखान पठाण यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. या प्रकरणी पठाण यांनी केलेल्या तक्रारीवरून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय कोळपे, गटनेता अफसर शेख यांच्यावर घराचे कुलूप तोडून घरातील सामानाची तोडफोड करीत नासधूस केल्याप्रकरणी औसा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.

औशाच्या नगराध्यक्षपदाची निवड उद्या (मंगळवारी) होणार असून, या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक सहलीस गेले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार मधुकर पिचड यांच्या आदेशावरून पक्षाच्या नगरसेवकांनी पक्षाच्या उमेदवारास मतदान करावे, यासाठी प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने सरचिटणीस शिवाजी गर्जे यांनी पक्षाचा व्हीप जारी केला आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाची निवड चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.
संगमेश्वर ठेसे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी काँग्रेससह राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. औसा पालिकेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक ७, काँग्रेसचे ६ व भाजप-शिवसेनेचे ५ नगरसेवक आहेत. गेल्या निवडीदरम्यान भाजप-सेनेच्या मदतीवर काँग्रेसचे ठेसे यांनी नगराध्यक्षपद मिळविले होते. एक वर्षांनंतर राजीनामा दिल्याने या पदासाठी पुन्हा निवड होत आहे. काँग्रेसचे सुनील मिटकरी, संगमेश्वर ठेसे, भाजपचे विद्यमान उपनगराध्यक्ष लहू कांबळे, राष्ट्रवादीचे गटनेते अफसर शेख यांनी या पदासाठी उमेदवारी दाखल केली. उमेदवारी मागे घेण्याची सोमवारी संधी होती. परंतु राष्ट्रवादीचे ३ व शिवसेनेचा १ असे ४ नगरसेवक सहलीस गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने पक्षादेश काढून नगरसेवकांची बैठक घेतली. जिल्हाध्यक्ष डी. एन. शेळके यांच्या उपस्थितीत अफसर शेख यांची पक्षाचा उमेदवार व गटनेता म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
सहलीस गेलेले ३ नगरसेवक या वेळी अनुपस्थित होते. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीने याची दखल घेतली. प्रदेशाध्यक्ष पिचड यांच्या आदेशावरून नगराध्यक्षपदासाठी अफसर शेख यांच्या उमेदवारीस मान्यता देण्यात आली. पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी पक्षाच्या उमेदवारास मतदान करावे, गैरहजर राहू नये, असा आदेश परवीन शेख, सुरय्या कुरेशी, शकिलाबी शेख, रशिदाबी तांबोळी, गुलाम अक्रम खान, डॉ. असलम अरब, डॉ. अफसर शेख व भरत सूर्यवंशी यांना देण्यात आला. या निवडीसाठी पक्षाच्या व्हीपप्रमाणे कार्यवाही करावी व अहवाल प्रदेश कार्यालयास पाठवावा, असा आदेश राज्यमंत्री तथा संपर्कमंत्री प्रकाश सोळुंके, निरीक्षक राणा जगजितसिंह पाटील व जिल्हाध्यक्ष शेळके यांना देण्यात आला.