News Flash

शिक्षणमंत्र्यांच्या आश्वासनानंतर नागो गाणारांचे उपोषण तूर्तास मागे

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर विधिमंडळाच्या पहिल्या दिवशी शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले शिक्षक

| December 9, 2014 07:32 am

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर विधिमंडळाच्या पहिल्या दिवशी शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले शिक्षक आमदार नागो गाणार यांनी तूर्तास उपोषण मागे घेतले.
राज्यातील शिक्षण विभागातील शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्य़ातील शाळेचे संच निर्धारण जुलै २०१४ मध्ये केले. या संच निर्धारणामुळे हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले. तसेच तीन वर्ष सेवा कालावधी न झालेल्या शेकडो शिक्षण सेवकांना सेवामुक्त व्हावे लागले. शासनाच्या या शिक्षक व शिक्षणहितसहीत विरोधी कृतीला महाराष्ट्र शिक्षक परिषदेने विरोध केला होता आणि न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने २९ नोव्हेंबर २०१४ ला शासनाच्या या कृतीला स्थगनादेश दिल्यानंतर अनेक ठिकाणी शाळेत अतिरिक्त शिक्षक नसताना त्यांना पत्र दिले जात आहे. संच निर्धारणाच्या आधारावर अतिरिक्त शिक्षक ठरविणे, त्याचे समायोजन करणे, त्याचे वेतन ऑफ लाईन काढणे या प्रक्रियेला तात्काळ प्रतिबंध घालावा आणि तसे आदेश राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक व शिक्षण संचालक यांना देण्यात यावे, अशी मागणी करीत शिक्षक आमदार नागो गाणार आणि नागनाथ मोते विधानभवनातील सभागृहाबाहेरील पायऱ्यावर उपोषणाला बसले. जोपर्यत शिक्षकांच्या मागण्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा आमदारद्वयांनी घेतला होता.
दरम्यान, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानभवन परिसरात गाणार यांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले आणि उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली. यावेळी विनोद तावडे म्हणाले, शिक्षकांच्या मागण्यासंदर्भात गाणार यांच्याशी चर्चा करून त्यांचे निवेदन स्वीकारले आहे. शाळेचे संच निर्धारण केले जात असले तरी कुठल्याही शिक्षकाला कामावरून कमी केले जाणार नाही. तीन वर्षे सेवा झालेल्या शिक्षण सेवकांना सुद्धा सेवा मुक्त होण्याचा प्रश्न नाही.
शाळेचे संच निर्धारण करताना त्यावर कोणावरही अन्याय होणार याची काळजी घेतली जाणार आहे. त्या संदर्भात शिक्षण सचिव, राज्यातील शिक्षण उपसंचालकांची बैठक आयोजित केली जाईल त्यात सकारात्मक निर्णय होऊन शिक्षकांना न्याय देण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. तावडे यांच्या आश्वासनानंतर गाणार यांनी उपोषण मागे घेतले, तरी बैठकीनंतर त्यातून काही तोडगा निघाला नाही तर उपोषण पुन्हा करण्यात येईल, असा इशारा गाणार यांनी राज्य सरकारला दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2014 7:32 am

Web Title: nago ganars hunger strike back after console by education minister
Next Stories
1 विदर्भ राज्य आंदोलन समितीचे राष्ट्रीय अधिवेशन शनिवारपासून’
2 पब्लिक फाऊंडेशन एक हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणार
3 भास्कराचार्यानी गणित रंजकपणे उलगडले – डॉ. चौथाईवाले
Just Now!
X