* आतडी, त्वचा, किडनीवर परिणाम 
* रासायनिक पदार्थाचा सर्रास वापर
शहरातील फळ बाजारात रासायनिक औषधांचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची विक्री केली जात असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्याने प्रशासन हादरले आहे. उन्हाळ्यातील सर्वोत्तम फळ समजला जाणारा आंबा कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी रासायानिक पदार्थाचा (कॅल्शियम काबाईड) उपयोग केला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यावर त्यांनी कळमना आणि कॉटेन मार्केट परिसरातील आंबा विक्रेत्यावर धाड टाकून जवळपास १०० ते १५० किलो आंबे जप्त केले आहेत. मात्र, एवढेस प्रमाण पुरेसे नाही. काही दिवसांपूर्वी काळात सरबत आणि पाणीपुरी विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली होती.
सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याचे प्रकार विक्रीला आले आहेत. आंब्याची चव घ्यायची एवढेच माहीत असलेल्या ग्राहकाला आंबा नेमका कोणत्या प्रकारचा आहे हे ओळखणे कठीण झाले आहे. नागपूरच्या बाजारात रत्नागिरी, हापूस, देवगड हापूस, केशर, बेगमपल्ली आंब्याची विक्री सुरू आहे.  आंब्याचा राजा ‘हापूस’ सर्वात महागडे फळ असून ६०० ते ८०० रुपये किलो प्रमाणे विकला जात आहे. त्यातही कच्चे आंबे स्वस्तात आणून त्यात रासायनिक औषधांचा वापर करून तो ग्राहकांना विकला जातो. असे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. रासायानिक पदार्थाचा वापर करून कृत्रिमरित्या पिकविलेली फळे आरोग्यास किती अपायकारक याचा विचार न करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर याचे दुष्पपरिणाम जाणवू लागले आहेत.
कृत्रिमरितीने पिकविलेले फळे खाल्ल्याच्या दुष्परिणांबद्दल ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीशी बोलताना ज्येष्ठ आहारतज्ज्ञ जयश्री पेंढरकर म्हणाल्या, रासायानिक पदार्थाचा उपयोग करून पिकविली जाणारी फळे मनुष्याच्या शरीराला घातक असून त्याचा परिणाम आतडी आणि किडनीवर होत असतो. मुळात फळांमध्ये जी जीवनसत्वे असतात ती रासायानिक पदार्थामुळे नष्ट होऊन जातात त्यामुळे अशा फळामधून जीवनसत्व काहीच मिळत नाही, लहान मुलांच्या शरीरावर त्याचा विपरित परिणाम हळूहळू सुरू होत असतो. वेगवेगळी फळे रासायानिक औषधांमध्ये साठवून ठेवल्यामुळे ती पाण्यात टाकल्यानंतर फॉस्फेरिक अ‍ॅसिड वायू तयार होत असल्याने आणि त्यामुळे शरीराची हाड ठिसूळ होत असतात. त्यामुळे पालकांनी फळाविषयी जागृत राहणे आवश्यक आहे, असे आवाहन डॉ. पेंढारकर यांनी केले.
बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर म्हणाले, फळे पिकविण्यासाठी रसायनांचा उपयोग केला जात असून तो  लहान मुलांसाठी अतिशय घातक ठरू लागला आहे. फळे पिकविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॅल्शियम औषधांपासून अ‍ॅसिटीलीन नावाचा वायू तयार होत असतो आणि त्याचा परिणाम मेंदूवर होत असतो. लवकर पिकवलेली फळे खाल्ली तर ताप येणे, मळमळ करणे, उलटय़ा होणे, जुलाब लागणे, आदी दुष्पपरिणाम दिसून येतात.
या संदर्भात कळमना बाजार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश छाबरिया म्हणाले, कळमना बाजारपेठमध्ये रत्नागिरी, आंध्रप्रदेश, कर्नाटक भागातून आंबा मोठय़ा प्रमाणात आयात केला जात              आहे.  साधारणात रोज १०० ते १५० ट्रक माल येत असतो. यंदा हापूस आंबा मोठय़ा प्रमाणात विक्रीला आला आहे. रासायानिक औषधांचा वापर केल्याच्या तक्रारी येत असल्या तरी त्याची तपासणी होणे आवश्यक आहे.