मराठी चित्रपटांमध्ये विनोदी चित्रपटांची लाट बराच काळापासून आहे असे मानले जाते. परंतु अलीकडे वेगवेगळ्या प्रकारचे, कधी कादंबरीवर, तर कधी सत्य घटनेवर आधारित चित्रपटांचे प्रमाण वाढते आहे ही चांगली बाब आहे. विनोदी पण नर्मविनोदी, खुसखुशीत, गालातल्या गालातला हसविणारा तरीही कथानकाची चांगली गुंफण असलेला चित्रपट आला, तो म्हणजे ‘नारबाची वाडी.’ कसलेले कलावंत दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनय कारकीर्दीतील कळस ठरावा अशी भूमिका त्यांनी साकारली आहे. प्रभावळकरांच्या अभिनय सामर्थ्यांला सर्व कलावंतांची लाभलेली चांगली साथ, निसर्गरम्य कोकणाचे चित्रण आणि संवादांची आतषबाजी यामुळे अस्सल मनोरंजन होते.
निसर्गरम्य कोकणातल्या एका छोटय़ा खेडय़ात राहणाऱ्या नारबाने आपल्या कष्टाने वाढविलेली नारळी-पोफळी-केळीची बाग आता चांगलीच फुलारलेली असते. छोटय़ा रोपांची आता वाडी उभी राहिलेली आहे. आपल्या वाडीतील झाडांशी हितगुज करणाऱ्या नारबाला त्याचा नातू पंढरी आणि वाडीतील सगळे वृक्ष ही दोन्ही आपली लेकरेबाळे आहेत असेच वाटत असते. त्याचे दोघांवरही नितांत, निरागस प्रेम आहे. परंतु गावातील रंगराव खोत आणि त्यानंतर त्याचा मुलगा मल्हारराव खोत यांना वाडीवर आपली मालकी, सत्ता हवी असते. त्यासाठी ते नारबाला जंगजंग पछाडतात. कथानक खरे तर हे आणि एवढेच आहे. परंतु प्रभावळकरांनी उभा केलेला नारबा, डोळ्यांत भरणारे कोकणातले चित्रीकरण, नारबाचा इबलिसपणा, खोताच्या सत्तेखाली आणि श्रीमंतीखाली दडपून गेलेले लोक, खोताबरोबरच पंढरीचाही नारबाच्या वाडीवर असलेला डोळा, त्यातून होणाऱ्या गमतीजमती यामुळे नर्मविनोदाची फोडणी देत लेखक-दिग्दर्शक आणि क्रिएटिव्ह प्रोडय़ुसर यांनी खुलविलेला हा चित्रपट प्रेक्षकाचे धमाल रंजन करण्यात निखालसपणे यशस्वी ठरतो.
सबंध चित्रपट नारबाची वाडी आणि वाडी असलेल्या गावातच घडतो. त्यामुळे चित्रपटभर विशिष्ट प्रकारची रंगसंगती सतत दिसते. त्यातून प्रेक्षक चित्रपटाच्या कथानकाशी, नारबाशी तादात्म्य पावतो. नारबाबरोबरच रंगराव खोत, मल्हारराव खोत या दुहेरी भूमिकांमधून मनोज जोशी यांनीही अस्सल अभिनय केला आहे. त्याला पंढरीच्या भूमिकेतील विकास कदम आणि बेरक्याच्या भूमिकेतील निखिल रत्नपारखी यांनी चांगली साथ दिली आहे. त्यामुळे भट्टी उत्तम जमली आहे.
लेखक-दिग्दर्शकाने सबंध चित्रपटाचा बाज नर्मविनोदी, खुसखुशीत राहील अशा पद्धतीने मांडणी केली आहे. भावनिक पातळीवर मूळचे कोकणातील परंतु आता शहरात वास्तव्य करणारे प्रेक्षक हळवे होतील. नारबाची ही वाडी पाहताना, तिथल्या पायवाटा पाहताना त्यांना नक्कीच गावाची आठवण होईल.
या चित्रपटात कूळ कायदा मोडीत निघाल्यापासून ते पुढे साधारण ३० वर्षांचा काळ दाखविला आहे. ४६ सालातील नारबा साठ वर्षांचा आहे आणि त्याच्या नातवाला मुलगा होतो इथपर्यंतचा नारबाचा प्रवास दाखविला आहे. सुरुवातीलाच १९४६ सालातील काळात चित्रपट सुरू होतो खरा, परंतु पुढे काळ कुठपर्यंत जातो ते दाखविलेले नाही.
कूळ कायदा रद्द झाल्यापासून आपले अधिकार सीमित झाल्याचे शल्य खोत मंडळींना असते. आपली सत्ता कमी झाल्याचे हे शल्य रंगराव-मल्हारराव खोतांच्या वागण्याबोलण्यातून दाखवितानाच पैशाचा हव्यास, खर्च करण्यातली कंजूषी हा कोकणी स्वभावही दिग्दर्शकाने चांगल्या प्रकारे दाखविला आहे.
‘शिऱ्या’ आणि ‘आबा’ यांची जोडी या चित्रपटात पुन्हा एकदा दाखविली असून त्यामुळेही प्रेक्षकाचे छान, निखळ मनोरंजन होते. नर्मविनोदी, मध्यमवर्गीय प्रेक्षकांचे दैनंदिन जीवन सहजपणे, नर्मविनोदाच्या अंगाने दाखविणाऱ्या हिंदी चित्रपट दिग्दर्शकांच्या शैलीचा अवलंब दिग्दर्शकाने चांगल्या पद्धतीने केला आहे. चित्रपटाचे सामथ्र्य पटकथा-संवाद लेखन व दिग्दर्शकाबरोबरच कलावंतांच्या निवडीमध्येही आहे. एकप्रकारे प्रभावळकर-मनोज जोशी यांच्या अभिनयाची वेगळ्या पद्धतीची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळते. दुहेरी भूमिका मनोज जोशी यांनी बहुधा पहिल्यांदाच साकारली असून दोन्ही भूमिकांचा तोल त्यांनी लीलया सांभाळला आहे. प्रभावळकरांची दीर्घ लांबीची प्रमुख भूमिका आणि त्यात वयाच्या साठीपासून ऐंशीपर्यंतचा दीर्घकाळ यातून त्यांनी अचूक नारबा उभा केला आहे.
वेशभूषांच्या बाबतीत सांगायचे तर ५० च्या दशकात किंवा त्यानंतरच्या काळातही कोकणातील गावांमध्ये राहणारे स्थानिक लोक चित्रपटात दिसतात तशी बटणांची बंडी वापरत नव्हते. परंतु गाणी, संगीत, अभिनय आणि पटकथेची गुंफण यामुळे वेशभूषेकडे दुर्लक्ष केले तरी चालण्यासारखे आहे.
नारबाची वाडी
फिल्म फार्म निर्मित
निर्माते – कल्याण गुहा, रूपाली गुहा.
दिग्दर्शक – अजय सरपोतदार.
पटकथा-संवाद-गीते – गुरू ठाकूर.
क्रिएटिव्ह प्रोडय़ुसर – नमिता वर्तक.
छायालेखक – राहुल जाधव.
कला दिग्दर्शक – शीतल कानविंदे, महेश कुडाळकर.
संगीत – मंगेश धाकडे.
कलावंत – दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, निखिल रत्नपारखी, भाऊ कदम, कमलाकर सातपुते, विकास कदम, ज्योती मालशे, किशोरी शहाणे, अंबरीश देशपांडे, शशिकांत केरकर, अतुल परचुरे व अन्य.