नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक होत असून दोन्ही गटांनी अध्यक्षपदांवर दावा केला आहे. त्यातच, या निवडणुकीत मुख्यमंत्र्यासह विविध राजकीय पक्षांच्या दिग्गजांनी लक्ष घातल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. दोन्ही गट बँकेवर आपले वर्चस्व स्थापन करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करत आहेत.
जिल्हा बँक संचालकांच्या निवडणुकीची धुळवड खाली बसत नाही तोच बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची मोर्चेबांधणी सुरू झाली. अध्यक्ष व उपाध्यक्षपद एक-एक वर्षांसाठी ठेवण्याचे सूत्र नक्की असले तरी दोन्ही गट या पदांवर आपली दावेदारी सांगत आहेत. मुख्यमंत्र्यासह माजी मंत्री छगन भुजबळ, मातोश्रीवरून हालचाली गतिमान झाल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वाचे लक्ष आहे. जिल्हा बँक निवडणुकीत आ. अपूर्व हिरे आणि माजी आमदार माणिक कोकाटे यांच्यापैकी एकाही पॅनलला बहुमत मिळाले नाही. तर काही अपक्ष सदस्यांनी आपला दबाव गट निर्माण केला. त्यांचे पारडे कोणाकडे झुकते आणि काय चमत्कार घडतो याविषयी सर्वाना उत्सुकता आहे.
हिरे गटाकडे १३ सदस्य असल्याचे सांगितले जाते. पण, त्यातील काही महत्वाकांक्षी संचालकांनी थेट अध्यक्ष पदावर दावेदारी सांगितल्याने हा आकडा बदलू शकतो. हिरे गटाकडून अद्वय हिरे आणि उपाध्यक्षपदासाठी सुहास कांदे यांचे नाव पुढे आले आहे. हिरेंच्या नावाला काहिसा विरोध असल्याने ऐनवेळी शिरीष कोतवाल यांचा पर्याय पुढे केला जाऊ शकतो. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी एक एक वर्षांचा कालावधी निश्चित असतांना एका सदस्याला राज्य बँकेवर प्रतिनिधी म्हणून पाठवून अकराचा कोटा पूर्ण करण्याची रणनिती हिरे गटाने अवलंबली आहे.
दुसरीकडे, कोकाटे यांच्या गटात केवळ सहा सदस्य असले तरी त्यांनी बँकेवर वर्चस्व स्थापित करण्यासाठी कंबर कसली आहे. हिरे गटातील असंतुष्ट संचालकांना गळाला लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शिवाजी चुंभळे आणि आ. जे. पी. गावित हे दोन संचालकांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. ते कोणत्या गटाचे समर्थन करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. दरम्यान, इगतपुरीचे संदीप गुळवे आणि कळवणचे धनंजय पवार यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी प्रयत्न केले. मात्र हिरे यांच्या दबाव तंत्रामुळे काहीच पदरी पडत नसल्याने त्यांचे तळ्यात मळ्यात सुरू आहे. जिल्हा बँक अध्यक्ष व उपाध्यक्षपद निवडणुकीत आर्थिक बळ महत्वपूर्ण ठरत असल्याचा अनुभव आहे. यंदा कोणत्याही पॅनलला स्पष्ट बहुमत नसल्याने त्यास अधिकच महत्व प्राप्त झाल्याची चर्चा आहे. या घडामोडीत बँकेवर कोणाचे वर्चस्व स्थापित होणार ही बाब बुधवारी निवडणुकीद्वारे स्पष्ट होईल.