दोन हंगामापासून बंद असलेला निफाड सहकारी साखर कारखाना सुरू करावा तसेच ऊस उत्पादकांना योग्य दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना मंगळवारी रस्त्यावर उतरली असताना दुसरीकडे कारखाना बंद असल्याचा दुष्परिणाम कामगारांच्या मुलांना भोगावा लागत आहे. कारखाना परिसरातील कामगार वसाहतीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याने ऐन परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. प्रशासनाने कामगार वसाहतीतील वीज पुरवठा त्वरीत पूर्ववत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
निफाड-नाशिक मार्गावरील पिंपळस फाटय़ावर मंगळवारी कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे काही वेळ रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कारखाना बंद असल्यामुळे निफाड परिसरातील ३५ हजार शेतकरी, ९५० कामगार आर्थिक विवंचतनेत सापडले आहेत. या पाश्र्वभूमीवर सकाळी नऊ वाजेपासून पिंपळस फाटय़ावर आंदोलनासाठी कार्यकर्ते जमू लागले. तहसीलदार डॉ. संदीप आहेर, नायब तहसीलदार, एस. डी. सोऩवणे यांनी प्रारंभी आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रवक्ते हंसराज वडघुले व नितीन रोठे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मात्र रास्ता रोकोच्या भूमिकेवर ठाम राहिले. यावेळी वडघुले यांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे उसाचा दर द्यावा या मागणीस कारखानदार आणि प्रशासन नकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे सांगितले.
निफाड कारखाना बंद ंअसल्याने तीन लाख टन ऊस गाळपविना पडून आहे. काही दिवसांनी उन्हाच्या तीव्रतेने उसाचे चिपाट होईल. कारखाना सुरू होत नसल्याने आंदोलनाचा इशारा दिल्याबरोबर प्रशासकांनी कारभार स्विकारला.
याचा अर्थ प्रशासकीय अधिकारी व प्रादेशिक सहसंचालक यांनी शासनाची चेष्टा चालविली आहे. या खेळात वैभवशाली परंपरा असलेला निसाका उद्ध्वस्त होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी एकजुटीने पुढे येणे गरजेचे आहे, असे आवाहन केले. प्रशासनाने कामगार वसाहतीतील वीज पुरवठा दोन दिवसात सुरळीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. जिल्ह्य़ात कापूस, मका केंद्र सुरू करावे, एफआरपी प्रमाणे ऊस दर द्यावा, यांसह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार डॉ. संदीप आहेर यांना देण्यात आले. यावेळी वडघुले यांच्यासह नितीन पाटील, किरण देशमुख, शरद लभडे, बी. जी. पाटील, संजय तासकर आदी उपस्थित होते.