शिशिर संपला, पानगळ जाऊन वसंत बहरू लागला आहे. वसंत ऋतू आणि माजी मुख्यमंत्री दिवं. वसंतराव नाईक यांची जन्मशताब्दी हा योग साधून नागपुरात ९ ते १३ फेब्रुवारीदरम्यान आयोजित राष्ट्रीय कृषी प्रदर्शन शेतक ऱ्यांसाठी वसंत बहरावा असेच ठरणार आहे. वर्धा मार्गावरील राष्ट्रीय कापूस संशोधन केंद्राच्या २० हेक्टर परिसरात आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन देशाचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेतील शेतक ऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी ‘कृषी वसंत २०१४’ चे आयोजन करण्यात आले आहे. लाखो शेतकरी व इतर लोकांशी विविध तालुका, मंडळ पातळीवर संपर्क साधला जाणार असून प्रादेशिक भाषांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिज एक प्रमुख भागीदार म्हणून या उपक्रमाशी जोडले आहे. सर्वासाठी हे प्रदर्शन सुरू होण्यापूर्वी कृषी विकास व नवप्रवर्तनांच्या घटनांवर प्रकाशझोत टाकण्यापूर्वी गुरुवारी ‘वॉकथ्रू’चे आयोजन करण्यात आले. कृषी खात्याचे अप्पर मुख्य सचिव सुधीर कुमार गोयल, केंद्रीय कृषी खात्याचे सहसचिव संजीव गुप्ता यांनी पत्रकारांना या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी राष्ट्रीय कापूस संशोधन केंद्राचे संचालक के.आर. क्रांती व हकीमुद्दीन अली उपस्थित होते. शेतक री केंद्रित हे प्रदर्शन आहे, असे गुप्ता म्हणाले.  ३ ते ५ लाख शेतकरी प्रदर्शनाला येतील. ३०० ते  ४०० बसेसची व्यवस्थाही करण्यात आली आहे.  ५० लाख लोक इंटरनेटच्या माध्यमातून याचा लाभ घेतील, असे गोयल म्हणाले.
या कार्यक्रमातून यशस्वी ठरलेल्या ९२ शेतक ऱ्यांच्या यशोगाथांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. यावेळी अन्नधान्ये, डाळी, चारा, तेलबिया, भाज्या, तंतूमय पिकांच्या शेतीचे ३०० प्रत्यक्ष अनुभव दाखविले जातील. अॅग्रो कंपन्या, संशोधन संस्था, विद्यापीठे, राज्य सरकारी संस्था, स्वयंसेवी संस्था आणि कृषी नवप्रवर्तकांचे ७५७ अंतर्गत स्टॉल्स राहतील. सवोत्तम दर्जाचे पशु, कोंबडय़ा आणि मासेही प्रदर्शनात मांडण्यात येतील. ५४ पेक्षा अधिक पिकांच्या ३०७ जातींची प्रात्यक्षिके, भाज्या, पिके व बियांचे एक हजार स्टॉल्स राहणार असून शेतकऱ्यांना पिकांबाबत माहिती देण्यासाठी प्रादेशिक भाषांमधील १०० प्रकारची पुस्तके दिली जाणार आहेत. प्रादेशिक भाषांमध्ये प्रत्यक्ष वेबकास्ट, जे शेतकरी प्रदर्शनात येऊ शकणार नाहीत, त्यांना जिल्हा किंवा तालुका पातळीवर बोलाविले जाईल. या प्रदर्शनात ९२ शेतकरी स्टॉल्स लावणार आहेत.
या प्रदर्शनासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देशभरातील विविध ठिकाणांहून नागपूरसाठी खास रेल्वे गाडय़ा सोडल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या आगमनापासून ते प्रयाणापर्यंतची सर्व व्यवस्था चोखपणे पार पडावी याची दक्षता घेतली जात आहे. राज्याबाहेरील शेतकऱ्यांच्या राहण्यासाठी नागपूर शहरातील ८८ मंगल कार्यालये राखीव ठेवण्यात आली आहेत. या निमित्ताने शेतकरी, नेते, धोरणकर्ते, कृषी क्षेत्रातील मान्यवर, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, कृषी उद्योग व उद्योजक, गुंतवणूकदार, आंतरराष्ट्रीय कृषी तज्ज्ञ, या क्षेत्रातील अन्य भागधारक एकाच छताखाली एकत्र येणार आहेत.