नुकत्याच झालेल्या शालांन्त परीक्षेत राज्यातील महानगरपालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या शाळांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांनी बाजी मारली आहे. पालिकेच्या सर्वच शाळांनी उत्तुंग यश मिळविले असून सरासरी ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सात शाळांमधून परीक्षेत बसलेल्या एकूण ८४१ विद्यार्थ्यांपैकी ७८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी रबाळे येथील शाळेची विद्यार्थीनी गायत्री महंती हिने ९४ टक्के गुण मिळवून मराठी माध्यमातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे. खान मारुफ साऊद ९३.६४ टक्के गुण मिळवून हिंदी माध्यमातून प्रथम आला आहे. घणसोली येथील विद्यालयाचा निकाल ९७.७४ टक्के लागला आहे.
सातपैकी सहा शाळांचा निकाल ९०टक्के पेक्षा जास्त आहे. महानगरपालिकेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे उपायुक्त  पटणीगीरे यांनी शाळांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापकांचे अभिनंदन केले आहे. या सर्व शाळांतील सर्व विद्यार्थी ‘लोकसत्ता’ यशस्वी भव उपक्रमात सहभागी झाले  होते.