गेले नऊ दिवस विविध व्रतवैकल्ये करून आदिशक्ती मातेची मंगलमय वातावरणात आराधना केल्यानंतर रविवारी विजयादशमीदिनी शक्तिदेवी मंडळांच्या सवाद्य मिरवणुकांनी नवरात्र महोत्सवाची सांगता झाली. पार्क मैदानावर शमीच्या वृक्षाभोवती सीमोल्लंघन करण्यासाठी व सोन्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या आपटय़ांची पाने लुटण्यासाठी अबालवृद्धांची एकच गर्दी उसळली होती. रात्री रावणाच्या पुतळय़ांचे दहन करण्यात आले.
नवरात्र महोत्सवात शक्तिदेवीमातेची आराधना करण्यासाठी शहर व परिसरात भक्तीचा सागर लोटला होता. तुळजापूरच्या भवानीमातेचे प्रतिरूप समजल्या जाणाऱ्या श्री रूपाभवानी मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते गेले नऊ दिवस भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. याशिवाय उत्तर कसब्यातील कसबादेवी, गणेश पेठेतील भावसार समाजाची श्री हिंगुलांबिका देवी, मराठा वस्तीतील शिवगंगा देवी, भारतीय चौकातील भवानीमाता, शुक्रवार पेठेतील शिवलाड समाजाची अंबाबाई तसेच कालिका देवी, निलगार इस्टेट येथील कालिमाता आदी ठिकाणी झालेल्या धार्मिक कार्यक्रमांत भाविकांनी मोठय़ा संख्येने भाग घेतला होता.
शहरात यंदाच्या वर्षी ४२३ सार्वजनिक शक्तिदेवी मंडळांनी ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली होती. अनेक मंडळांनी आकर्षक रोषणाई आणि पौराणिक विषयावर आधारित देखावे सादर करून नवरात्र महोत्सवाची आगळीवेगळी परंपरा कायम ठेवली होती. महाअष्टमीला विविध ठिकाणी होमहवनाचे विधी पार पडले. विविध मंडळांनी सजावटीबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले होते.
रविवारी सायंकाळी विजयादशमीनिमित्त मंगळवार पेठ पोलीस चौकी येथून भरपावसात निघालेल्या नवरात्र महोत्सवाच्या सांगता मिरवणुकीतील अग्रभागी बलिदान चौकातील जयभवानी नवरात्र उत्सव शक्तिपूजा मंडळाच्या शक्तिदेवीची पूजा सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र शक्तिपूजा महोत्सव सुसूत्रता मंडळाचे विश्वस्त अध्यक्ष शिवाजी पिसे व उत्सव मंडळाचे अध्यक्ष आनंद मुस्तारे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. या मिरवणुकीत श्री हिंगुलांबिका देवीची पालखी व छबीना, शिवलाड समाजाचा नंदीध्वज, इंद्रभवानी मातेची पालखी व नंदीध्वजाचा सहभाग वैशिष्टय़पूर्ण ठरले होते. मिरवणुकीत आझाद हिंद नवरात्र महोत्सव मंडळाचा आकर्षक रोषणाई केलेला रथ मिरवणुकीची शोभा वाढविणारा ठरला. जयभवानी मंडळ व भवानी पेठेतील जागृती नवरात्र मंडळाचा लेझीम ताफा शिस्तबद्ध व तेवढाच भव्य स्वरूपाचा होता. सुदर्शन नवरात्र महोत्सव मंडळ, शुभमंगल नवरात्र उत्सव मंडळ, आकाशगंगा मंडळ, ओमशक्ती पूजा मंडळ, जेमिनी मंडळ, जय जगदंबा मंडळ, बुरुड समाज मंडळ, विजयालक्ष्मी मंडळ, संत हरळय्या समाज यासह अनेक मंडळांपुढील लेझीम ताफ्यात तरुण बेधुंद होऊन खेळ करीत होते. काही मंडळांच्या समोर उडत्या चालीच्या गीतांवर कलेचा आविष्कार घडविणारे नृत्य पथक सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. या मिरवणुकीत सुमारे १३ मंडळे सहभागी झाली होती. मधला मारुती, माणिक चौक, विजापूर वेस, सिद्धेश्वर पंचकट्टा, सिद्धेश्वर मंदिरमार्गे ही मिरवणूक रात्री पार्क मैदानावर पोहोचली. त्या ठिकाणी सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र शक्तिपूजा सुसूत्रता मंडळाच्या वतीने मिरवणुकीतील सर्व मंडळांचे स्वागत करण्यात आले.
नवरात्र महोत्सवाच्या सांगता मिरवणुकीच्या वेळी शहरात मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांच्या अधिपत्याखाली शीघ्र कृतिदलासह मिरवणूक मार्गावर तसेच आसपासच्या गल्लीबोळातही पोलीस नेमण्यात आले होते. मिरवणूक मार्गावरील दैनंदिन वाहतूक बंद करून अन्यत्र वळविण्यात आली होती.
विजयादशमीनिमित्त सायंकाळी पार्क मैदानाला सीमोल्लंघनासाठी जत्रेचे स्वरूप आले होते. ‘आई राजा उदे उदे’च्या गगनभेदी घोषणांनी सारा आसमंत दणाणून गेला होता. तेथील शमीच्या वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालून सोने लुटण्यात आले. पूर्वापार परंपरेनुसार ग्रामजोशी मंडळींनी शमीच्या वृक्षाची पूजा करून भाविकांना सोने वाटले. सीमोल्लंघनानंतर सद्भावनेचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या आपटय़ांची पाने एकमेकांना देऊन नागरिक शुभेच्छा देत होते. रात्री पार्क मैदानावर व जुळे सोलापुरात रावण पुतळय़ांचे दहन करण्यात आले. या वेळी नागरिकांची गर्दी उसळली होती. विजयादशमीनिमित्त झेंडूंच्या फुलांची मोठय़ा प्रमाणात आवक झाली होती. फुलांचे दर ३० रुपये ते ६० रुपयांपर्यंत वाढलेले होते. दुपारनंतर या दरात निम्म्याहून अधिक कमी झाले.
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजल्या जाणाऱ्या विजयादशमीनिमित्त वाहने, दूरचित्रवाणी संच, फ्रीज, मोबाइल संच, संसारोपयोगी वस्तू यासह सोने, चांदी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. विजयादशमीदिनी सोन्याचा भाव १० ग्रॅमला ३० हजार ३०० रुपये एवढा तर चांदीचा प्रतिकिलो दर ४९ हजारांच्या घरात होता. सोने-चांदीच्या दरातील चढउताराच्या पाश्र्वभूमीवर व्यापारी व पगारदार मध्यमवर्गीयांनी सोने-चांदीची मोठय़ा प्रमाणात खरेदी केल्याने सराफ बाजारात दिवसभर चांगली उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.
धम्मचक्र परिवर्तनदिन
५७ वर्षांपूर्वी दसऱ्याच्याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्याच्या ऐतिहासिक घटनेची स्मृती म्हणून धम्मचक्र परिवर्तनदिन बुधवारी बौद्धधर्मीयांनी उत्साहाने साजरा केला. यानिमित्ताने शहरात धाकटा राजवाडा व थोरल्या राजवाडय़ासह विविध आंबेडकरी वस्त्यांतून हजारो स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांनी बुद्धवंदना केली. मोटारसायकलींवरून फेरी काढण्यात आली. सायंकाळी पांजरापोळ चौकातील छत्रपती शिवाजी पुतळय़ापासून प्रबुद्ध भारत ग्रुप मंडळाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीचे नेतृत्व बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केले होते. पार्क चौकातील डॉ. आंबेडकर पुतळय़ाजवळ पोहोचल्यानंतर ही मिरवणूक विसर्जित झाली. बुद्धदर्शन मंडळ, जीएम ग्रुप आदी मंडळांच्या शिस्तबद्ध मिरवणुका पाहावयास मिळाल्या. सायंकाळी समता सैनिक दलाच्या वतीने पार्क चौकात डॉ. आंबेडकर पुतळय़ासमोर समता सैनिकांनी सलामी दिली. नंतर शेजारच्या नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर समता सैनिकांनी संचलन केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन
दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी शहरात प्रथमच विविध तीन भागांतून भागातून शिस्तबद्ध संचलन करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. बाळीवेस, साईबाबा चौक व जुळे सोलापुरातून एकाच वेळी सुरू झालेले हे संचलन विविध मार्गावरून होत असताना मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तत्पूर्वी, काल शनिवारी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला भवानी पेठेतील जयभवानी प्रशालेच्या प्रांगणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शस्त्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेखर नायडू हे उपस्थित होते. संघाचे जिल्ह संघचालक दामोदर दरगड व शहर संघचालक राजेंद्र काटवे यांच्यासह प्रमुख स्वयंसेवकांची उपस्थिती होती.

Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन
Saint Balumamas Rathotsav ceremony ended today with excitement
कोल्हापूर : भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत संत बाळुमामांचा रथोत्सव उत्साहात