चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवून हा मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात यश मिळविले आहे. पतीपाठोपाठ पत्नीने हा मतदारसंघ सर केला आहे. राष्ट्रवादीच्या संध्यादेवी कुपेकर यांनी २४ हजार ८४७ मतांची आघाडी घेऊन मोठा विजय मिळवताना निकटचे प्रतिस्पर्धी स्वाभिमानी पक्षाचे राजेंद्र गडय़ान्नावर यांचा पराभव केला. तिरंगी लढतीत शिवसेनेचे सुनील शिंत्रे तिसऱ्या स्थानावर टिकले गेले.    
विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनामुळे या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागली होती. कुपेकर यांनी या मतदारसंघात केलेल्या कामांची नोंद व त्यांच्याविषयी असलेले सहानुभूती याचा मोठा लाभ संध्यादेवी कुपेकर यांना झाल्याचे मतदानातून दिसून आले. कुपेकर यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी कायम ठेवली होती. पहिल्याच फेरीत त्यांना ३ हजार ७०७ मते मिळाली होती. तर सेनेच्या शिंत्रे यांना २२२७ मते मिळाली होती. गडय़ान्नावर १९१८ मते घेऊन तिसऱ्या स्थानी होती. दुसऱ्या फेरीपासून मात्र गडय़ान्नावर यांनी शिंत्रेंपेक्षा अधिक मते घेण्यास सुरुवात केली. पण त्यांना कुपेकर यांच्या आसपास पोहचणे कठीण झाले होते. कुपेकर यांनी तिसऱ्या फेरीतच १० हजार मतांचा टप्पा ओलांडला होता, तर गडय़ान्नावर यांना हा आकडा गाठण्यासाठी पाचवी तर शिंत्रे यांना नवव्या फेरीपर्यंत वाट पाहावी लागली होती.    
एकूण २५ फेऱ्यांमध्ये मतदान झाले. अखेरच्या फेरीतही कुपेकर यांना १८९६, गडय़ान्नावर यांना २५२५ तरशिंत्रे २९३ मते होती. कुपेकर यांना एकूण ९३ हजार ४८६, गडय़ान्नावर यांना ६८ हजार ८३८ तर शिंत्रे २२ हजार ४४८ इतकी मते मिळाली. या निवडणुकीसाठी २ लाख ८९ हजार ४१८ मतदारांपैकी १ लाख ८४ हजार ५७३ मतदारांनी मतदान केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विवेक आगवणे यांनी काम पाहिले. मतमोजणीवेळी निवडणूक निरीक्षक जी. जे. चंपानेरी, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजाराम माने उपस्थित होते. निकाल जाहीर झाल्यानंतर संध्यादेवी कुपेकर यांना निवडणूक निर्णय अधिकारी आगवणे यांनी विजयी झाल्याचे प्रमाणपत्र सुपूर्द केले. या वेळी संग्रामसिंह कुपेकर, डॉ. नंदा बाभूळकर यांच्यासह कुपेकर यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. कुपेकर यांची विजयाकडे वाटचाल सुरू झाल्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली होती. त्या विजयी झाल्याचे जाहीर केल्यावर उत्साहाला उधाण आले होते.