गुणवत्तेचे शिक्षण देणारा लातूर पॅटर्न सर्वत्र प्रचलित आहे. आता काळाची गरज ओळखून चाकोरीबाहेरचे शिक्षण देणारा लातूर पॅटर्न निर्माण होण्याची गरज असल्याचे मत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी व्यक्त केले.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री केशवराज विद्यालयातील गुणवंतांच्या गौरव सोहळय़ात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी होते. व्यासपीठावर भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल महाजन, नितीन शेटे, अतुल ठोंबरे, तुकाराम गोरे, जितेश चापसी, डॉ. महेश देवधर, मुख्याध्यापक मंजुळदास गवते उपस्थित होते.
तावडे म्हणाले, डिजिटल क्रांती अतिशय झपाटय़ाने होते आहे. आपल्या काळात दिव्याखाली अभ्यास केला या बाबी मुलांना सांगून उपयोगाच्या नाहीत. आता त्यांच्या नशिबाने त्यांना भौतिक सुविधा मिळत आहेत. पालकांनी स्वत: जागरूक राहून आपल्या मुलांना काळानुरूप शिक्षण देण्याकडे लक्ष दिले पाहिजे. अभियांत्रिकी व वैद्यकीय या दोन शाखांव्यतिरिक्त शिक्षणात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या नव्या पर्यायाकडे विद्यार्थी वळतील यासाठीची त्यांची तयारी प्रारंभापासून केली पाहिजे. आयएएस, आयपीएस, यूपीएससी अशा स्पर्धात्मक परीक्षांची तयारी शाळेपासूनच केली पाहिजे. चांगला शास्त्रज्ञ, ग्रामीण विकासाचा विचार करणारा तंत्रज्ञ, स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक काम करण्याची तयारी असणारा तरुण निर्माण करण्यासाठी लातूरकरांनी पुढे येण्याची गरज आहे. २०३० मध्ये जगात भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जाणार आहे. तेव्हा प्रशिक्षित मानव संसाधन तयार असणे ही काळाची गरज राहणार आहे. त्या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
व्हॅलेंटाईन डेसंबंधी काहीजणांची मते भिन्न असतील; मात्र आपण आपले आदर्श तरुणांसमोर ठेवायला कमी पडत आहोत. आपला इतिहास नीट अभ्यासून तो तरुणांसमोर ठेवण्याची गरज आहे. जेआरडी टाटांना जर्मनीतून तंत्रज्ञान आणून कारखाना भारतात उभा करावा व जमशेदपूरची जागाही स्वामी विवेकानंदांनी दाखवली होती. विवेकानंद हे तरुणांचे आदर्श आहेत, हे नीट समजावून सांगितले पाहिजे. घरात पालकांनी आपल्या पाल्यांशी संवाद साधला पाहिजे. स्त्रियांना घरात बरोबरीची वागणूक मिळत आहे, असा अनुभव मुलांना आला तरच ते भावी काळात आपल्यात बदल करून घेतील अन्यथा स्त्री ही पुन्हा एकदा पिचलेलीच राहील.
अध्यक्षीय समारोप लक्ष्मीरमण लाहोटी यांनी केला. डॉ. महेश देवधर, तुकाराम गोरे, आकांक्षा धायगुडे यांची समयोचित भाषणे झाली.