केंद्र सरकारने सहकार कायद्यात केलेल्या बदलांचा लाभ घेण्यासाठी सहकारी बँकांनी कामकाजात आमूलाग्र बदल घडवण्याची गरज असल्याचे मत कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले.
प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात बँकेचे अध्यक्ष कॅप्टन विजयराव गुणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रवरा बँकेची विशेष सर्वसाधारण सभा आज पार पडली. त्या वेळी मंत्री विखे बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, बँकेचे माजी अध्यक्ष पांडुरंग खर्डे, उपाध्यक्ष कारभारी ताठे, राहाता पंचायत समितीचे उपसभापती सुभाष विखे, ट्रक सोसायटीचे अध्यक्ष नंदू राठी, शांतिनाथ आहेर, ज्ञानदेव म्हस्के, किसनराव विखे, आदी उपस्थित होते. नव्या कायद्यातील बदलांमुळे आलेले नियम स्वीकारून काही उपविधी सभेत मंजूर करण्यात आले.
मंत्री विखे म्हणाले, प्रवरा सहकारी बँकेने कर्जवितरणात बदल घडवून ठेवींच्या प्रमाणात सत्तर टक्के कर्ज वितरण करण्याचा प्रयत्न केल्यास नफ्यामध्ये वाढ होईल. कोअरबँकिंग, इंटरनेट बँकिंग, एटीएम सुविधा सुरू कराव्यात. कर्मचाऱ्यांना बदलांसाठी प्रशिक्षित करावे.
बँकेचे माजी अध्यक्ष पांडुरंग खर्डे यांनी आदर्श उपविधी व शिफारशींचे वाचन केले. बँकेच्या वतीने दुष्काळ निवारण निधीसाठी १ लाख १ हजार रुपयांचा धनादेश विखे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. बँकेचे कार्यकारी अधिकारी दीपक ठाकूर, उपकार्यकारी अधिकारी अमृतराव कटारिया, सहायक कार्यकारी अधिकारी मिच्छद्र थोरात तसेच सभासद मोठय़ा संख्येने उपस्थित होते.