देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात ब्राह्मण समाजाचा पुढाकार वाखाणण्याजोगा होता, परंतु काळानुरूप बदलांच्या दृष्टीने आता आत्मपरीक्षणाची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी येथे केले.
येथील ब्राह्मण सभेच्या वतीने आयोजित गुणगौरव समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ‘लोकसत्ता’चे ब्युरो चीफ महेंद्र कुलकर्णी, महासंघाचे सरचिटणीस अद्वैत देहाडराय, नगर येथील समर्थ मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अच्युत पिंगळे, माजी उपनागराध्यक्ष सुधाप्पा कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, ब्राम्हण सभेचे अध्यक्ष संजीव देशपांडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
गोविंद कुलकर्णी म्हणाले, ब्राह्मणांना नोकरीत आरक्षण नाही, परंतु गेल्याच महिन्यात कृषिमंत्री शरद पवार यांनी आर्थिक निकषावर समाजाला आरक्षण द्यावे अशी टिप्पणी केली. मात्र ब्राह्मणांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणे ही काळाची गरज आहे. ब्राह्मणांवर असलेला एका पक्षाचा शिक्का ही ओळख पुसणे गरजेचे आहे. कोणत्या पक्षाला सत्तेच्या दो-या द्यावयाच्या हे ठरवण्याची ताकद समाजात आहे. देशात एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात ब्राह्मण समाजाची लोकसंख्या ११ टक्के असल्याचेही त्यांनी सांगितले.
महेंद्र कुलकर्णी, अ‍ॅड. पिंगळे, संजय सातभाई आदींची या वेळी भाषणे झाली. सुरुवातीला संजय देशपांडे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. संस्थेच्या वतीने बांधण्यात येणा-या मंगल कार्यालयाच्या मदतीसाठी त्यांनी आर्थिक सहकार्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. बाळासाहेब कुलकर्णी, संजय कुलकर्णी आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन देशपांडे यांनी केले.