माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा त्यांच्या समर्थकांकडून पसरवली जात असली, तरी कर्नाटक विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेस नेत्यांनी त्यांना दूरच ठेवले आहे. राजकारणात कमी कालावधीत उत्कृष्ट संघटनकौशल्य निर्माण करणाऱ्या आमदार अमित देशमुख यांना गुलबर्गा जिल्हय़ाची जबाबदारी देणाऱ्या काँग्रेसने माजी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा वाळीत टाकले आहे.
कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहात आहेत. भाजपतील अंतर्गत संघर्षांचा फायदा घेत विजयासाठी काँग्रेसने व्यूहरचना आखली आहे. महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांतल्या नेत्यांवर कर्नाटकात निरीक्षकपदाची धुरा सोपवली. मराठवाडय़ातून केवळ आमदार अमित देशमुख यांना ही संधी मिळाली. मराठवाडय़ात शिवाजीराव निलंगेकर व अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत. अन्य काही ज्येष्ठ नेतेही या विभागात आहेत. अशोक चव्हाण यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा त्यांच्या समर्थकांकडून पसरवली जात असली तरी त्यांना वाळीत टाकण्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे धोरण कायम असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले.
दोन दिवसांपूर्वी मराठवाडय़ातल्या दुष्काळासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदार, जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दांडी मारली. किंबहुना ते या बैठकीस उपस्थित राहावेत यादृष्टीने मुख्यमंत्री किंवा अन्य कोणाही नेत्यांनी प्रयत्न केले नाहीत. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर आले होते. अशोक चव्हाण यांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण राहुल गांधींनी त्यांना टाळण्याचा गौप्यस्फोट माजी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केला होता. कर्नाटक निवडणुकीपासूनही त्यांना दूर ठेवण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांच्या अस्वस्थतेत आणखीनच भर पडली आहे.
मराठवाडय़ातल्या नांदेड व लातूरच्या सीमेवर कर्नाटक राज्य आहे. कर्नाटकातल्या गुलबर्गा जिल्हय़ात आठ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी अमित देशमुख यांच्यावर सोपवली आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अशी आमदार देशमुख यांची सुरुवातीची ओळख असली तरी स्वत:च्या संघटनकौशल्याने त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधले आहे.
अशोक चव्हाण, भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासारख्या दिग्गजांना दूर ठेवत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अमित देशमुख यांना संधी दिल्याने आगामी काळात लातूर जिल्हा पुन्हा नांदेडला वरचढ ठरतो काय, अशी शंका स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. देशमुख परिवार आणि कर्नाटक राज्याचे जिव्हाळय़ाचे संबंध आहेत. यापूर्वीही विलासराव देशमुख यांनी कर्नाटकातील वेगवेगळय़ा निवडणुकांच्या वेळी, तसेच पक्षांतर्गत अडचणी निर्माण झाल्यानंतर तेथील कार्यकर्ते व नेत्यांशी संबंध साधून यशस्वी मध्यस्थी केली होती.
मराठवाडय़ात दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी जालना व औरंगाबादचा दौरा केला होता. दुष्काळाची माहिती घेऊन त्यांनी काही उपाययोजना सुचविल्या. शिवाय मदतीचे आश्वासनही दिले. पण मराठवाडय़ाचे नेते म्हणवून घेणाऱ्या अशोक चव्हाण यांनी दुष्काळग्रस्त भागाकडे पाठ फिरविली. एवढेच नव्हे तर जनता विकास परिषदेने आयोजित केलेल्या बैठकीलाही त्यांनी दांडी मारली.