‘‘जलसंवर्धनाकडे देशात म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. जलसंवर्धनासंबंधी कायदा असावा यासाठी गेली कित्येक वर्षे आग्रह धरला जात आहे. परंतु या प्रयत्नांना यश येत नाही. आपल्याकडे केंद्राचे पाणी धोरण नाही. मग राज्यांच्या पाणी धोरणाची तर बातच नको!’’ असे मत ज्येष्ठ निसर्ग संवर्धक डॉ. असद रहमानी यांनी व्यक्त केले.
जर्मन दिग्दर्शक नॉर्बट जी. सुचानेक आणि ब्राझिलियन दिग्दर्शक मार्सिया गोम्स् डी. ऑलिव्हिएरा यांच्या हस्ते रविवारी किलरेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी डॉ. रहमानी यांना त्यांच्या कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच लघुपट दिग्दर्शक संदेश कडूर आणि ‘बायफ’ या संस्थेला वसुंधरा मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आले. महोत्सवाचे अध्यक्ष विजय वर्मा, संजय किलरेस्कर, संयोजक वीरेंद्र चित्राव, वनविभागाचे उपायुक्त राजेंद्र कदम, चित्रपट दिग्दर्शक श्रीप्रकाश या वेळी उपस्थित होते.
डॉ. रहमानी म्हणाले, ‘‘देशातील जलस्रोतांकडे दुर्लक्ष झाले आहे. गंगा- यमुना या नद्यांची प्रदूषणामुळे गटारे झाली आहेत. पुण्याच्या मुळा- मुठा नद्यांची अवस्थाही वेगळी नाही. जलस्रोतांच्या संवर्धनासाठी अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. आजवर पृथ्वीने जीवसृष्टीची पाच विलोपने पाहिली आहेत. ही सर्व विलोपने नैसर्गिक होती. मात्र पशुपक्ष्यांच्या अनेक प्रजातींच्या विलोपनाचा दर आता पूर्वीपेक्षा तीन ते चार पटींनी वाढला आहे. पूर्वी नानज येथे तीस- चाळीस माळढोक पक्षी सहज पाहता येत. आता मात्र संपूर्ण राज्यातही तीस माळढोक उरलेले नाहीत.’’
या वेळी महोत्सवाच्या अंतर्गत अणुऊर्जाविषयक ‘युरेनियम चित्रपट महोत्सवा’चेही उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवाबाबत बोलताना नॉर्बट जी. सुचानेक म्हणाले, ‘‘अणुऊर्जाविरोधी चळवळीला प्रसारमाध्यमांमध्ये स्थान दिले जात नाही. परंतु हा विषय प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याशी निगडित आहे. व्यापक जनसमुदायापर्यंत तो पोहोचविण्याच्या उद्देशानेच हे चित्रपट  बनविण्यात आले आहेत.’’