मुंबईतील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सवांचा हंगाम ज्या महोत्सवापासून सुरू होतो तो वरळी येथील नेहरू सेंटरचा १७ वा राष्ट्रीय नाटय़ोत्सव २३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत संपन्न होत आहे. यंदाच्या नाटय़ोत्सवाचं वैशिष्टय़ म्हणजे मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, कन्नड, पंजाबी आणि बंगाली अशा पंधरा नाटकांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.
मराठी व्यावसायिक रंगभूमीवर अनेक पुरस्कारांनी गाजलेलं सुरेश चिखलेलिखित, राजन ताम्हाणे दिग्दर्शित ‘प्रपोजल’ हे नाटक २४ सप्टेंबरला दु. २.३० वा. या महोत्सवात सादर होणार आहे. एक तरुण वेश्या आणि एक पोलीस अधिकारी यांच्यातील मुग्ध प्रेमकहाणी या नाटकात पाहायला मिळते. आदिती सारंगधर आणि आस्ताद काळे यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. प्रायोगिक रंगभूमीवरील रसिकांच्या प्रशंसेस पात्र ठरलेलं ‘अडगळ’ हे एकपात्री नाटक २६ सप्टेंबरला दु. २.३० वा. सादर होईल. शाहीर संभाजी भगतलिखित व संतोष वेरुळकर दिग्दर्शित या नाटकात झोपडपट्टीतील चाळीत राहणाऱ्या एका तरुण बेरोजगाराचं वैफल्यग्रस्त आयुष्य चितारण्यात आलं आहे. घरच्यांच्या अपेक्षा, नोकरीअभावी होणारा कोंडमारा, आजूबाजूचं बेचैन करणारं वास्तव, तरुण वयातल्या दडपल्या गेलेल्या वासना आणि या सगळ्याशी एकाच वेळी झगडताना होणारी त्या तरुणाची कुतरओढ ‘अडगळ’मध्ये दाखवली आहे. सुनील तांबट यांनी या एकपात्री नाटकाचं शिवधनुष्य अत्यंत ताकदीनं पेललं आहे. नाटककार मोहन राकेश यांचं ‘आषाढ का एक दिन’ हे कविश्रेष्ठ कालिदासाच्या जीवनावरील नाटक. अनेक भारतीय भाषांतून त्याचे प्रयोग झाले आहेत. राजकवी म्हणून प्रसिद्धी आणि वैभवाच्या शिखरावर विराजमान होण्यापूर्वीचं कालिदासाचं खेडय़ातलं निसर्गाच्या सान्निध्यातलं मनमुक्त, विभोर आयुष्य आणि त्यातून बहरलेली त्याची उत्कट काव्यप्रतिभा.. मल्लिकेसारख्या समर्पित प्रेयसीच्या सहवासानं तिला अधिकच धुमारे फुटतात. परंतु उज्जयनीच्या राजा चंद्रगुप्ताने सन्मानानं त्याला राजकवी म्हणून निमंत्रित केल्यावर मल्लिका आपल्या प्रेमाला तिलांजली देऊन कालिदासाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ही संधी स्वीकारण्यास त्याला भाग पाडते. राजकवी म्हणून रुजू झाल्यावर कालिदास प्रसिद्धी, वैभव, मानसन्मानाने श्रेष्ठतम पदाला पोहोचतो. राजकन्या प्रियांगुमंजरीशी त्याचा विवाह होतो. मात्र, आपल्या गावी आल्यावर तो मल्लिकाला भेटायचं टाळतो. त्याची पत्नी मल्लिकाची भेट घेते आणि राजवाडय़ात सेवेत असलेल्या एखाद्या सेवकाशी तिचं लग्न लावून देण्याचा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवते. परंतु मल्लिका त्यास ठाम नकार देते. परंतु कटु वास्तवास सामोरं जात अखेरीस मल्लिकेला विलोमसारख्या वाईट माणसाशी लग्न करावं लागतं. पण तिनं मनीमानसी जपलेलं कालिदासावरचं प्रेम कायम असतं. त्याच्या सगळ्या रचना ती प्राणपणानं जपते. एके दिवशी कालिदासाला आपल्या वैभवातलं वैय्यर्थ ध्यानी येतं आणि त्या सगळ्याचा त्याग करून तो आपल्या गावी परततो. परंतु तोवर खूप उशीर झालेला असतो.. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी मोहन राकेश यांच्या या गाजलेल्या नाटकाचं ‘आषाढातील एक दिवस’ हे मराठी रूपांतर केलं असून, अतुल पेठे यांनी ते दिग्दर्शित केलं आहे. महोत्सवात ३० सप्टेंबर रोजी दु. २.३० वा. याचा प्रयोग होणार आहे.
नाटककार प्रेमानंद गज्वी यांचं ‘गांधी-आंबेडकर’ हे बहुचर्चित नाटक. राजकारणात परस्परांसमोर आव्हान उभे करणाऱ्या या दोन महान नेत्यांना आमनेसामने आणून त्यांच्यातील विवादास्पद मुद्दय़ांवर गज्वींनी त्यांना या नाटकात आपल्या पद्धतीनं बोलतं केलं आहे. या मूळ मराठी नाटकाचं कन्नड रूपांतर या महोत्सवात सादर होणार आहे. डी. एस. चौघले यांनी त्याचं कन्नड रूपांतर केलं असून, सी. बसवलिंगय्या यांचं दिग्दर्शन आहे. २७ सप्टेंबर रोजी दु. २.३० वा. ते सादर होईल.
मिच् अल्बम यांच्या ‘टय़ुस्डेज् विथ मॉरी’ या आत्मकथनावर आधारीत स्वत: लेखक आणि जेफ्री हॅचर यांनी केलेलं नाटय़रूपांतर या नाटय़महोत्सवात सादर होत आहे. (मराठी रंगभूमीवर ‘वा! गुरू!’ नावानं हे नाटक मंचित झालं होतं.) मीरा खुराणा दिग्दर्शित या नाटकात मिच् अल्बम हा नाणावलेला पत्रकार एकेकाळचे आपले आवडते प्राध्यापक असलेले प्रो. मॉरी असाध्य आजाराने ग्रस्त असल्याचे कळल्याने त्यांच्या भेटीस जातो.. आणि मग जातच राहतो. दर आठवडय़ाच्या या भेटींमध्ये त्यांच्यातले बंध अधिकाधिक दृढ होत जातात. प्रो. मॉरींच्या सहवासात मिच्च्या जाणिवेच्या आणि माणूसपणाच्या कक्षा कळत-नकळत कशा विस्तारत जातात, हे या नाटकात अत्यंत साधेपणानं, पण उत्कटतेनं दर्शवलं आहे. ३० सप्टेंबरला सायं. ७.३० वा. या नाटकाचा प्रयोग होणार आहे.
महोत्सवात सादर होणारे ‘पोस्टकार्डस् फ्रॉम बारडोली’ हे रामू रामनाथन लिखित व जैमिनी पाठक दिग्दर्शित नाटक १९२८ साली ब्रिटिश सरकाराने लादलेल्या जुलमी शेतसाऱ्याच्या विरोधात बारडोलीच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी  वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या लढय़ाच्या पाश्र्वभूमीवर आजचे वास्तव मांडते. २८ सप्टेंबरला सायं. ७.३० वा. याचा प्रयोग होईल.
हैदराबादचा संस्थापक कवी-राजपुत्र कुली कुतुबशाह आणि त्याची हिंदू प्रेयसी भागमती यांची प्रेमकहाणी रेखाटणारं ‘कुली-दिलों का शहजादा’ हे उर्दू नाटक २९ सप्टेंबर रोजी सायं. ७.३० वा. होईल. नूर व मोहम्मद अली बेग लिखित, कादीर झमन अनुवादित या नाटकात भिन्नधर्मी असूनही कुतुबशहा आणि भागमतीच्या अलवार प्रेमकहाणीतून हैदराबादसारखे वैभवशाली सांस्कृतिक शहर कसे उदयास आले, याचं मनोज्ञ दर्शन घडतं.  
‘कैद-ए-हयात’ हे शायर मिर्झा गालिबच्या जीवनावरील नाटक (लेखक- सुरेंद्र वर्मा, दिग्दर्शक- डॉ. दानिश इक्बाल), शहीद भगतसिंगांच्या बलिदानाचा संदर्भ घेऊन वर्तमानावर भाष्य करू पाहणारं ‘मेरा रंग दे बसंती चोला’ (लेखक-दिग्दर्शक : केवल धारिवाल), आपल्या सुशिक्षित मुलीनं लग्न करून ‘चूल आणि मूल’ याच पारंपरिक चाकोरीतून जावं यासाठी अट्टहास करणाऱ्या आई-वडिलांची बावरी ही मुलगी त्यांचं न मानता घराबाहेर पडून फॅशनजगतात आपलं करीअर घडवते, या कथाबीजाभोवती फिरणारं ‘बावरी’ (लेखक-दिग्दर्शक : इम्तियाझ पटेल), वसंत कानेटकरांच्या मूळ मराठी नाटकाचं हिंदी रूपांतर ‘चिंता छोड चिंतामणी’, रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्यातील नायिकांच्या आधारे आजच्या समाजातलं स्त्रियांचं स्थान दर्शविणारं ‘मानसी’ हे नाटक (लेखक- उज्जल चट्टोपाध्याय, दिग्दर्शिका- डॉ. उषा गांगुली), १९५० च्या दशकातील हिंदी सिनेमाच्या सुवर्णयुगाचं चित्रण करणारं ‘सलाम- १९५० के नाम’ (लेखन-दिग्दर्शन : नादिरा बब्बर), प्रत्यक्ष सहवासातही कंठावं लागणारं निष्प्रेम आयुष्य आणि प्रत्यक्ष सहवासाविनासुद्धा जगत असलेलं प्रेमविभोर आयुष्य.. असा दुहेरी पेच विणलेलं ‘वैशाखी कोयल’ हे व्यक्तीजीवनातील विरोधाभास प्रकट करणारं नाटक (लेखक- डॉ. सीतांशु यशचंद्र, दिग्दर्शक- कपिलदेव शुक्ला), पारंपरिक पंजाबी कुटुंबात लग्न होऊन गेलेल्या मित्रो या बंडखोर तरुणीची कथा चितारणारं ‘मित्रो मरजानी’ (लेखक- कृष्णा सोबती, दिग्दर्शक- देवेन्द्र राज अंकुर) अशी अन्य नाटकंही या महोत्सवाचं आकर्षण असणार आहेत. देशाच्या बहुसांस्कृतिकतेचं चित्र साकारणारा हा नाटय़महोत्सव  रसिकांनी बिलकूल चुकवू नये असाच.