डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील नवजात बालक विभाग गेल्या चार वर्षांपासून परेसा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे बंद आहे. या विभागासाठी आवश्यक डॉक्टर, परिचारिका नसल्यामुळे हा विभाग सुरू करणे शक्य नाही, अशी माहिती आहे. हा विभाग बंद असल्याने आपत्कालीन परिस्थितीत मुंबई, ठाण्याकडे धाव घेण्याशिवाय रुग्णांना पर्याय नसतो, अशी माहिती आहे.
  चार ते पाच वर्षांपूर्वी शास्त्रीनगर रुग्णालयात अनुभवी बालरोगतज्ज्ञ होते. रुग्णालयात सहा इनक्युबेटर आहेत. मात्र या यंत्रांची हाताळणी करण्यासाठी पुरेसे डॉक्टर, कर्मचारी नाहीत. दोन बालरोगतज्ज्ञ रुग्णालयात आहेत. ते बाह्य़रुग्ण तपासणी विभागात कार्यरत असतात. अजून चार बालरोगतज्ज्ञांची रुग्णालयाला गरज आहे. शास्त्रीनगर रुग्णालयात सुमारे १०० ते १५० महिला प्रसूती होण्यासाठी येतात. ज्या महिलांची परिस्थिती नाजूक असते त्यांना अधिक उपचारासाठी ठाणे, मुंबई येथे पाठविले जाते. महापालिकेकडून डॉक्टरांची भरती करण्याचे प्रयत्न केले जातात. पण मुलाखती आणि त्यानंतरचा वेळ वेळखाऊ असल्याने डॉक्टर तेवढा वेळ थांबण्यास तयार नसतात. त्यामुळे अनेक डॉक्टर मुलाखती देऊनही हजर होण्यास येत नाहीत, असे रुग्णालय सूत्राने सांगितले.