कोपरगाव-नगर रस्त्यावर शहरानजीक गोदावरी नदीवर समांतर पूल बांधून चार वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही तो वाहतुकीसाठी खुला होऊ शकलेला नाही. या रस्त्याचे चौपदरीकरणही रखडले आहे.
कोपरगाव शहरानजीक गोदावरी नदीवरील जुन्या पुलालगत समांतर पूलाचे काम नाशिकच्या ए. बी. लोढा इन्फ्राक्ट्रक्चर कंपनीने उपठेकेदारास दिले होते. हे काम सन २००९ अखेरीस पूर्ण झाले. एकूण ११ मोऱ्यांचा हा समांतर पूल तयार होऊनही अद्यापही वाहतुकीस खुला करण्यात आलेला नाही. पुलाची १० मीटर, २०० मि. मी. रुंदी, ३०० मीटर लांबी असून नदी पात्रापासून १५ मीटर उंचीचा व ‘प्रिस्टेसिंग’ पद्धतीने पुलाचे काम करण्यात आले आहे. सध्याच्या जुन्या पुलाच्या पलिकडच्या जागेत हा समांतर पूल तयार स्थितीत आहे. मात्र गेल्या चार वर्षांपासून तो खाला न झाल्याने वाहतुकीस मोठय़ा अडचणी येतात.
गोदावरी नदीवर नगर-मनमाड रस्त्यावरील जुना पूल रहदारीला धोकादायक बनला आहे. या पुलास जवळपास ६५ वर्षे झाली आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूंचे उंच कठडे कोसळले आहेत. वाहनांची वर्दळ वाढल्याने पुलास मोठे हादरे बसतात. त्यातच शेकडो अवजड वाहने, कंटेनर येथून सातत्याने जात असल्याने कठडे व पूल कोसळण्याची भिती व्यक्त होत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक, नगर अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही त्याला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.