मुंबईतील २० उपनगरीय स्थानकांचा कायापालट करण्यासाठी तब्बल दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करणाऱ्या मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाने काही महत्त्वाचे प्रकल्प मात्र बासनात गुंडाळले आहेत. या महत्त्वाच्या प्रकल्पांना रेल्वे बोर्डाने मदतीचा हात दिला असता, तर मुंबईकरांचा रेल्वे प्रवास आणखी सुखाचा होण्याची शक्यता होती. मात्र काही हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या मोठय़ा प्रकल्पांबाबत विचार करणाऱ्या रेल्वे बोर्डाने या तुलनेने छोटय़ा आणि तरीही परिणामकारक प्रकल्पांकडे पाठ फिरवली आहे. त्याउलट स्थानकांच्या सुशोभिकरणावर खर्च करण्याची गरज नसताना तिथे सढळ हस्ते पैसे खर्च करण्याची तरतूद केली आहे.
युरोपमधील एखाद्या देशाच्या लोकसंख्येएवढी वाहतूक मुंबईची उपनगरीय रेल्वे दर दिवशी करते. मात्र या रेल्वेवर सुधारणा आणि नवीन प्रकल्प होण्याची गरज आहे. मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी पाच महत्त्वाचे प्रकल्प एमआरव्हीसीतर्फे मांडण्यात आले होते. यात विरार-वसई-दिवा-पनवेल उपनगरीय रेल्वेमार्ग, गोरेगाव-बोरिवली हार्बर मार्गाचा विस्तार, बोरिवली-विरार पाचवी-सहावी मार्गिका, कल्याण-कर्जत आणि कल्याण-कसारा या दरम्यान तिसरी-चौथी मार्गिका या पाच महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश होता. त्यासाठी सर्वेक्षणही सुरू झाले होते.
मात्र सोमवारी एमआरव्हीसीचे संचालक प्रभात सहाय यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे पाच प्रकल्प मागे ठेवण्यात आल्याचे सूतोवाच केले. त्याऐवजी पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग, ऐरोली-कळवा ट्रान्सहार्बर मार्ग, विरार-डहाणू मार्ग आदी महत्त्वाच्या प्रकल्पांचे घोडे रेल्वे बोर्डापुढे सरकवण्यात आले आहे. त्यातच मुंबईतील २० स्थानकांचा कायापालट करण्याचा प्रकल्पही अंतर्भूत करण्यात आला आहे. वास्तविक चकचकीत स्थानकांपेक्षाही वक्तशीर आणि कमी गर्दीच्या लोकल गाडय़ा ही मुंबईकरांची प्राथमिक गरज आहे. त्यासाठी बासनात गुंडाळलेले हे पाच प्रकल्प मार्गी लागण्याची गरज आहे.विरार-पनवेल या उपनगरीय मार्गामुळे लाखो प्रवाशांचा प्रवास सुखाचा होण्याची शक्यता आहे. तर कल्याणपुढे तिसरी आणि चौथी मार्गिका झाल्यास या मार्गावर कसारा आणि कर्जतपर्यंत जलद गाडय़ा चालवणे शक्य होणार आहे. गेल्या काही वर्षांत कल्याणपुढे अंबरनाथ, आसनगाव, बदलापूर, टिटवाळा आदी स्थानकांच्या आसपास लोकवस्ती प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका ही काळाजी गरज बनली आहे. हार्बर मार्गाची व्याप्ती लक्षात घेता हा मार्ग पश्चिम रेल्वेवर बोरिवलीपर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. मात्र अद्याप तो गोरेगावपर्यंत नेण्याची योजना असून त्यातही अनेक अडचणी आहेत. हे प्रकल्प मार्गी लागल्यास उपनगरीय प्रवाशांवरील मोठा भार कमी होऊन आरामदायक प्रवासाचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
स्थानकांच्या कायापालटासाठी रेल्वे बोर्ड आणि एमआरव्हीसी अपर डेक उभारून तेथे तिकीट विक्री केंद्र, रिक्षा-टॅक्सी स्टँड अशा योजना आखत आहे. त्याचप्रमाणे स्थानकांवर सरकते जिने, उद्वाहक आदी सुविधा देण्यात येणार आहेत. मात्र या सुविधांपेक्षा सुखकारक प्रवासाची गरज असल्याने हे पाच प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याची आवश्यकता प्रवासी संघटना बोलून दाखवत आहेत.