News Flash

संकेतस्थळांमुळे मैत्रीचे नवे बंध

‘रविवारी नॅशनल पार्क, बोला कोण येतंय? मस्त पाऊस पडतोय छान कान्हेरी गुंफाना जाऊया, मटणावर ताव मारुन रविवार जागूया’.. पावसाळा सुरू झाला की व्हॉट्स अपच्या ग्रुप्सवर

| August 2, 2014 01:08 am

‘रविवारी नॅशनल पार्क, बोला कोण येतंय? मस्त पाऊस पडतोय छान कान्हेरी गुंफाना जाऊया, मटणावर ताव मारुन रविवार जागूया’.. पावसाळा सुरू झाला की व्हॉट्स अपच्या ग्रुप्सवर हे मेसेज यायला सुरवात होते. सुरवातीला सगळे होकार भरतात, पण रविवार जवळ येत जातो आणि एकेकजण काही ना काही कारणांमुळे मागे हटतो.
नोकरदार तरुणमंडळींच्या गटामध्ये या फसलेल्या योजनांची यादी मोठी असते. इतरांच्या घरी ऐनवेळी एखादा कौटुंबिक कार्यक्रम उद्भवतो आणि त्यामुळे रविवारची हक्काची सुटीही कौटुंबिक कर्तव्यापायी खर्च होते. तरुणांना या संकटातून सोडवण्यासाठी यावेळेसही इंटरनेट पुढे आले आहे. ‘मिटअप.कॉम’, ‘मिटइट.कॉम’, ‘मिटटेंट.कॉम’, ‘शुअरटूमिट.कॉम’, ‘ग्रुपलूप.कॉम’, ‘ग्रुपस्पेस.कॉम’ सारख्या संकेतस्थळांच्या माध्यमातून एकाच प्रकारची आवड असलेले एकाच शहरातील अनोळखी चेहरे एकत्र येऊन आपली शनिवार-रविवारची सुटी सत्कारणी लावण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखूही लागले आहेत. फेसबुकवरसुद्धा असेच गट बनत आहेत आणि व्हॉट्स अपच्या माध्यमातून त्यातील काही मंडळी एकत्र येऊन कार्यक्रमांचे आयोजनही करीत आहेत. समाजात फारशा न मिसळणाऱ्या एकलकोंडय़ा अमेरिकन तरुणांना एकत्र आणण्यासाठी २००२ मध्ये स्कॉट हेइफर्मन यांनी ‘मिटअप.कॉम’ ही साइट सुरु केली. सध्या इतर संकेतस्थळांच्या तुलनेत ही साइट आपल्याकडेही नेटकरांमध्ये बऱ्यापैकी लोकप्रिय आहे.
यापूर्वी इंटरनेटवर डेटिंगच्या अनेक साइट्स उपलब्ध होत्या. पण त्यावर भेटण्यामागे नात्यात अडकण्याचाही तरुण-तरुणींचा एक उद्देश असायचा. मैत्रीच्या संकेतस्थळांवर भेटणारी मंडळी मात्र पूर्णपणे निखळ मत्री भावनेनंच भेटतात. तुम्हाला ज्या विषयाची आवड असेल त्याच्या नावाचा ग्रुप शोधायचा. त्याचे सदस्य झालात की दरवेळी ग्रुपमध्ये आखल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये तुम्हाला सहभागी होता येते. या साइट्सवर गिर्यारोहक, चित्रपटप्रेमी, पुस्तकप्रेमी, नाटय़रसिक, प्राणीमित्र तसेच फक्त मुलांचा किंवा मुलींचे ग्रुपसुद्धा असतात. या गटांचे एक किंवा अधिक आयोजक असतात, ते महिन्यातून ठरावीक दिवशी कार्यक्रमांचे आयोजन करतात. त्यात तुमची उपस्थिती कळवायची, आगाऊ पसे भरायची गरज पडल्यास आयोजकाच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करायचे आणि ठरलेल्या तारखेला, वेळेवर सर्वाना भेटायचे, अशी या ग्रुप्सची रचना असते.
या गटांमध्ये पुस्तकांच्या अदलाबदलीपासून ते दोन-तीन दिवसांच्या गिरीभ्रमंतीपर्यंतचे विविध उपक्रम पार पडतात. मध्येच कोणी नवीन सदस्य झाला, तर त्यांची सगळ्यांशी ओळख व्हावी म्हणून एखादा गाठीभेटीचा कार्यक्रमही ठरतो. अशाच एका ‘सिंगल बर्डस’ नावाच्या ग्रुपचा आयोजक असलेल्या अभिशेख चंद्रशेखरनच्या म्हणण्यानुसार, ‘आम्ही येथे इमेलच्या माध्यमातून भेटतो. कोणत्याही नवीन सदस्याला ग्रुपमध्ये घेण्याआधी त्याच्याबद्दल पुरेशी माहिती मिळवली जाते. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार होत नाहीत. आपले दूरध्वनी क्रमांक इतरांना देणेही ऐच्छिक बाब असते. त्यामुळे सदस्यांच्या सुरक्षितेची काळजी घेतली जाते आणि त्यातही कोणाचे वागणे खटकले तर त्याला ग्रुपमधून काढले जाते.’
आपल्या मित्रांबरोबर सुटी साजरी करण्याबाबत प्रत्येकाच्या परस्परविरोधी संकल्पनामुळे कित्येक कार्यक्रम बारगळतात. या साइट्सवर मात्र एकाचप्रकारची आवड-निवड असलेली मंडळी कार्यक्रम ठरवतात, म्हणून कार्यक्रम फसण्याचे प्रमाण कमी असते. म्हणूनच मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, कोलकाता अशा शहरांमधील तरुणमंडळी शहरांनुसार ग्रुप बनवू लागले आहेत. या गटांमध्ये तरुणांची व्याख्या त्यांच्या वयाकडे पाहून नाही तर उत्साहाकडे पाहून केली जाते. त्यामुळेच इथे काही पन्नाशीतील मंडळीसुद्धा काही ग्रुप चालवतात आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. यापुढे एकटे असाल तर या नेटच्या दुनियेतील अनोळखी चेहऱ्यांशी मत्री करायला काहीच हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 1:08 am

Web Title: new friendship trends on social sites
Next Stories
1 मैत्रीच्या आणाभाका जपणाऱ्या दिवसाचा कट्टय़ांना वेध
2 आता सीएसटी-उरण लोकल!
3 रेल्वे अधिकाऱ्याच्या प्रसंगावधानाने प्रवाशांचे प्राण वाचले
Just Now!
X