नाताळ व नववर्षांनिमित्त १५ वर्षांपासून विविध स्पर्धा घेण्याचा समता स्पोर्टस् क्लबचा उपक्रम कौतुकास्पद असून अशा स्पर्धामधून तरुण पिढीला निश्चितच प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.
येथील समता स्पोर्टस् क्लबच्या वतीने नाताळ व नववर्षांनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धावणे, स्लो व फास्ट सायकिलग स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचे पारितोषिक वितरण व सासंकृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार वाकचौरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. भास्कर खंडागळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले, सुनील मुथा, उपसरपंच अशोक गवते, रिवद्र खटोड, अजय डाकले यावेळी उपस्थित होते.
आजची तरुण पिढी भरकटत चालली असून मैदानी खेळांकडे या पिढीचे दुर्लक्ष होत आहे. खेळांऐवजी ते व्यसनांच्या अधिन होत असल्याचे दिसून येत आहेत. समता स्पोर्टस् क्लब मात्र विविध स्पर्धाच्या माध्यमातून व उपक्रमातून तरुणांना खेळाकडे आकर्षित करीत असल्याचे खंडागळे यावेळी म्हणाले. नवले व मुथा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी क्लबच्या वतीने आयोजित गरजा महाराष्ट्र या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.
गोंधवणी सोसायटीच्या अध्यक्षपदी लबडे
गोंधवणी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी माजी आमदार भानुदास मुरकुटे गटाचे बापूसाहेब लबडे यांची, तर उपाध्यक्षपदी हरिभाऊ तुपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सेवा संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आज सकाळी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली. माजी नगरसेवक नंदकिशेर लबडे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. विजय मोरगे यांनी केलेल्या अध्यक्षपदाच्या सूचनेस गोरक्षनाथ सोनवणे यांनी अनुमोदन दिले, तर उपाध्यक्षपदासाठी प्रविण फरगडे यांनी केलेल्या सूचनेला प्रयागाबाई लबडे यांनी अनुमोदन दिले. प्रारंभी दत्तात्रय कांदे यांनी प्रास्ताविक केले, तर अमोल गागरे यांनी सूत्रसंचालन केले.
शिर्डी-मुंबई रेल्वेचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाला पाठवणार
शिर्डी व्हाया दौंड-पुणे-मुंबई जलद पॅसेंजरला स्वतंत्र गाडीचा दर्जा द्यावा, हा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे सादर करण्यात येईल, असे आश्वासन मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे व्यवस्थापक ए. के. प्रसाद यांनी रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत दिले.
विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक सोलापूर रेल्वे कौन्सील हॉलमध्ये झाली. समितीचे सदस्य रमेश कोठारी, सुधीर डंबीर यांनी दौंड-मनमाड मार्गावर मुंबईस जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय असून, शिर्डी, मुंबई जलद पॅसेंजरला सात बोगी आहेत. त्या अपूर्ण पडतात. अनेक वर्षांपासून जादा बोगी जोडण्याची मागणी करूनही अद्याप बोगी वाढविल्या जात नसल्याबद्दल बैठकीत तक्रार करूनही अद्याप बोगी वाढविल्या जात नसल्याबद्दल बैठकीत तक्रार करून लक्ष वेधले.
श्री. प्रसाद यावेळी म्हणाले, की शिर्डी-मुंबई पॅसेंजरला दौंडहून विजापूर व पंढरपूरच्या सहा बोगी जोडण्यात येतात. त्यामुळे बोगी वाढविणे अशक्य आहे. परंतु प्रवाशांसाठी शिर्डी-मुंबई जलद पॅसेंजरला रेल्वे प्रशासनाने स्वतंत्र दर्जा देण्याचा प्रस्ताव, तसेच पंढरपूर विजापूरसाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.
अनिल बांगरे (कोल्हार) यांनी शिर्डी व बेलापूर रेल्वे स्थानकावर व्हीआयपी रिटायरींग रूम तयार करण्यात यावे व शिर्डीसाठी सर्व गाडय़ांना आरक्षण कोटा देण्याची मागणी केली. संग्राम म्हस्के (नगर) यांनी देहरे बाय पास रस्त्यावरील रेल्वे पुलाचे बांधकाम एक वर्षांपासून बंद असल्याबाबत बैठकीत लक्ष वेधले असता, काम सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.