ठाणे महापालिकेचे आयुक्त आर.ए.राजीव यांच्या आग्रहामुळे भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता करप्रणालीचे भूत पुन्हा एकदा बाटलीबाहेर निघेल अशी भीती ठाणेकरांमधून व्यक्त होऊ लागली असतानाच या नव्या करप्रणालीच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना कोणताही त्रास देण्याचा उद्देश नाही, अशी स्पष्ट भूमिका महापालिका प्रशासनाने आता घेतली आहे. ही नवी करप्रणाली शहरात लागू करायची नाही, असा निर्णय यापूर्वीच ठाणे महापालिकेच्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतला आहे. हा निर्णय आयुक्त राजीव यांनीही स्वीकारला आहे, अशी माहिती महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नव्या करप्रणालीचे भूत पुन्हा एकदा बाटलीबंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 
ओवळा-माजीवडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि आर.ए.राजीव यांच्यातील वादाने आता टोक गाठले असून या वादातून भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीवरुन नव्याने चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही करप्रणाली ठाण्यात राबवायची नाही, असा निर्णय महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतला आहे. यासंबंधी एक ठरावही करण्यात आला आहे. हा ठराव विखंडीत करावा, असे पत्र आयुक्त राजीव यांनी राज्य सरकारला पाठविले असल्याचा धक्कादायक आरोप आमदार सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना केला. केवळ राजीव यांच्या आग्रहामुळे ही प्रणाली ठाणेकरांच्या माथ्यावर मारली जात आहे, असा आरोपही सरनाईक यांनी केला. दरम्यान याप्रकरणी गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करण्यात येत असून ठाणेकरांना कोणताही त्रास देण्याचा हेतू नाही, असा खुलासा महापालिका प्रशासनाने केला आहे. राज्यातील सर्व महापालिकांनी मालमत्ताकराची नवी प्रणाली लागू करावी, असा अधिनियम राज्य सरकारने जून २०१० मध्ये पारित केला आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावाविषयी शासनाकडून मार्गदर्शन मिळावे, यासाठी हे पत्र पाठविण्यात आले आहे, अशी माहिती संदीप माळवी यांनी दिली. नवी करप्रणाली राबवायची नाही असे ठरल्याने महापालिकेच्यावार्षिक उत्पन्नात ३२ कोटी रुपयांची तूट येईल, असे प्रशासनाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे महासभेचा निर्णय आयुक्तांना मान्य आहे, हे स्पष्ट आहे, असेही माळवी यांनी स्पष्ट केले.