मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंसाठीच्या ‘शोध समिती’वर नागपूरच्या ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे’चे (नीरी) संचालक डॉ.एस. आर. वाटे यांच्या नावाची शिफारस विद्यापीठाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती आहे.

सध्याचे कुलगुरू राजन वेळूकर यांचा कार्यकाळ जुलै, २०१५मध्ये संपतो आहे. त्यामुळे, नव्या कुलगुरूंच्या नियुक्तीकरिता तिघाजणांच्या शोध समितीवर विद्यापीठातर्फे एका शिक्षणतज्ज्ञांच्या नावाची शिफारस करावी, अशी सूचना राज्यपालांनी केली होती. हा तज्ज्ञ विद्यापीठाशी संबंधित नसावा, असा नियम आहे. विद्यापीठाच्या विद्वत आणि व्यवस्थापन समितीच्या संयुक्त बैठकीत या सदस्याची निवड करण्यात येते. त्यासाठी सोमवारी विद्यापीठाने बैठक बोलाविली होती. ‘संबंधित सदस्याचे नाव बैठकीत एकमताने निवडण्यात आले आहे. हे नाव राज्यपालांना कळविण्यात येईल,’ असे विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांनी सांगितले. विद्यापीठाने नाव उघड करण्यास नकार दिला असला या बैठकीत डॉ. वाटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
डॉ. वाटे यांच्यासह दिल्लीच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे माजी संचालक प्रा.रघुनाथ शेगावकर, टाटा कॅन्सरचे संचालक राजेंद्र बडवे आणि समाजशास्त्राचे अभ्यासक प्रा. महेंद्र देव आदींच्याही नावाचा विचार या बैठकीत करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या नावांची शिफारस करणाऱ्या सदस्यांनी संबंधित नावे मागे घेतल्याने अखेर वाटे यांच्या नावावर शिफारस करण्यात आली. व्यवस्थापन समितीचे सदस्य संजय शेटय़े आणि प्रा. पी. जी. जोगदंड यांनी माटे यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती आहे. दरम्यान २०१०पासून नागपूरच्या नीरीचे संचालकपद भूषविणारे डॉ.वाटे हे मूळचे नागपूरकरचेच असून यांच्या शिफारसीने सत्ताधाऱ्यांचे देशाच्या उपराजधानीविषयी असलेले प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे. डॉ.माटे हे पर्यावरण जैवतंत्रज्ञान या विषयातील तज्ज्ञ आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नलमध्ये त्यांचे ५१ शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत. शिवाय राष्ट्रीय स्तरावरील जर्नलमधूनही त्यांनी विपुल संशोधनपर लिखाण केले आहे. त्यांच्या नावावर दोन पेटंट जमा आहेत. जागतिक बँकेच्या पर्यावरणविषयक विविध प्रकल्पांमधून आणि समित्यांवर ते कार्यरत आहेत.