ज्यांना जायचे असेल ते जाऊ शकतात, या पुढील काळातही आपले आंदोलन अराजकीय पद्घतीनेच सुरूच राहील, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या रविवारी राळेगणसिद्घीत पार पडलेल्या बैठकीत स्पष्ट केले.
जनलोकपालाच्या मागणीसाठी दिल्लीतील ऐतिहासिक आंदोलनानंतर अण्णांशी फारकत घेऊन ‘आम आदमी पार्टी’च्या रूपाने अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत नेत्रदीपक यश संपादन केले. केजरीवाल यांना मिळालेल्या या यशानंतर अण्णांसोबत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये सध्या चलबिचल सुरू झाली आहे. माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी नरेद्र मोदींवर स्तुतिसुमने उधळली. पर्यावरणवादी नेत्या मेधा पाटकर यांनी ‘आप’ला समर्थन दिले. माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांचेही तळय़ात, मळय़ात सुरू आहे. आंदोलनातील सामान्य कार्यकर्त्यांनाही ‘आप’ची भुरळ पडू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर राळेगणसिद्घीत झालेल्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या बैठकीत हजारे यांनी कोणाचेही नाव न घेता मतप्रदर्शन केले.
‘आंदोलनाची पुढील दिशा’ या विषयावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. लवकरच बिहार, झारखंड तसेच ओडिशा या राज्यांत हजारे यांच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात येणार असून जनजागृतीचे काम सुरूच ठेवण्यात येणार आहे. लोकपाल विधेयकासाठीच्या आंदोलनास मिळालेल्या यशानंतर आता ग्रामसभांना अधिकार, राईट टू रिजेक्ट, राईट टू रिकॉल, दप्तरदिरंगाई, कष्टकरी कामगार तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुढील आंदोलन करण्यात येणार असल्याचे अण्णांनी सांगितले.
लोकपाल विधेयकाची मंजुरी हा जनशक्तीचाच विजय असल्याचे सांगून सामाजिक दबाव निर्माण करण्यात यश आल्यानेच हे शक्य झाले. कोणाचेही सरकार सत्तेवर येवो सामाजिक दबावामुळे नाक दाबले की तोंड उघडते, याची प्रचिती वेळोवेळी आली आहे. त्यामुळे अराजकीय पद्घतीने आंदोलने करून समाजहिताचे कायदे करण्यास भाग पाडता येऊ शकते याचा आपणास विश्वास असल्याने ज्यांना आंदोलनापासून दूर जायचे ते जाऊ शकतात. यापुढील काळात अराजकीय पद्घतीने माझे आंदोलन सुरूच राहील असेही अण्णांनी या वेळी स्पष्ट केले.
बैठकीस आंदोलनाचे सचिव अशोक सब्बन, खजिनदार श्याम असावा, उपाध्यक्ष प्रा. बालाजी कोंपलवार, अल्लाउद्दीन शेख, अजित देशमुख, प्रा. बाळासाहेब हाके, डॉ. शिवनाथ कुंभारे, गजानन हरणे यांच्यासह जिल्हय़ांचे निमंत्रक, जिल्हा सचिव यांच्यासह सुमारे अडीचशे कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते अशी माहिती अण्णांचे स्वीय सहायक दत्ता आवारी यांनी दिली.