ग्रामीण भागात रुग्ण सेवा देणारे आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून तर अस्थायी डॉक्टरांना चार महिन्यांपासून पगार न मिळाल्याने यावर्षी ग्रामीण भागातील डॉक्टरांची दिवाळी अंधारातच जाणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे. 
गेल्या काही दिवसात डेंग्यू आणि मलेरिया रुग्णांची संख्या बघता अनेक जिल्हा आणि तालुका पातळीवरील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांना चोवीस तास काम करावे लागत आहे. मात्र, त्या कामाचा प्रशासनाकडून मोबदला मिळत नसल्यामुळे अनेक डॉक्टरांनी काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. नागपूर जिल्ह्य़ात ११०च्या जवळपास वैद्यकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णालयात अनेक सोयी सुविधा नसताना डॉक्टर अतिशय कठीण परिस्थितीमध्ये रुग्णांवर उपचार करीत असतात. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन ५ तारखेच्या आत होते मात्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गेल्या चार महिन्यापासून अस्थायी डॉक्टरांना तर तर दोन महिन्यापासून स्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांना (टीएचओ) वेतन देण्यात आलेले नाही.
वेतनासंदर्भात अनेकदा डॉक्टरांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली मात्र प्रत्येक वेळी आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. अंमलबजावणीच होत नसल्याने आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. अद्याप पगार न झाल्यामुळे यावर्षीची दिवाळी अंधारात जाणार का असा प्रश्न अनेक डॉक्टरांनी उपस्थित केला. ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेतील काम करणाऱ्यांची ही अवस्था आहे तर अन्य कर्मचाऱ्यांचे काय असा प्रश्न उपस्थित केला.
जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. मिलिंद गणवीर यांनी नुकताच डॉ. झारे यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. डॉक्टरांच्या वेतनाबाबत डॉ. गणवीर म्हणाले, नुकताच पदभार घेतल्यामुळे जिल्ह्य़ातील डॉक्टरांचे वेतन कुठे अडले यांची माहिती घ्यावी लागेल. भंडाऱ्यातील सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबपर्यंत वेतन त्यांच्या खात्यात जमा केले आहे. दिवाळीपूर्वी नागपूर विभागातील डॉक्टरांचे वेतन देण्याचा प्रयत्न करू, असेही डॉ. गणवीर म्हणाले.