दुष्काळाच्या वणव्यात आणि पाणीटंचाईच्या विळख्यात बीडवासीयांची होणारी तगमग आणखी किमान दोन महिने तरी सुसह्य़ होणार आहे. येत्या दोन महिन्यांत पाणीटंचाई जाणवू नये, या साठी नगरपालिकेने माजलगाव धरणात विहीर खोदून घेतली. महत्त्वाकांक्षी माजलगाव फुगवटय़ाची (बॅकवॉटर) योजना राबवून डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी नागरिकांची पाण्याच्या भटकंतीपासून तूर्त सुटका केली.
सध्या हंडाभर पाण्यासाठी कडक उन्हाची पर्वा न करता भटकंती करण्याची वेळ मराठवाडय़ात सर्वत्र आल्याचे चित्र आहे. कोटय़वधी रुपये खर्च करून गावे-वाडय़ा-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईने मोठय़ा शहरांतून लोक गावाकडे, तर गावातले लोक जनावरांबरोबर छावण्यांमध्ये गेले आहेत. इतर धरणांप्रमाणे बिंदुसरा धरणानेही दोन महिन्यांपूर्वीच तळ गाठला. बीडकरांना सहा दिवसाला एकदा पाणीपुरवठा होत आहे. या पाश्र्वभूमीवर वरील उपाययोजना करण्यात आली आहे.
बीड शहराला बिंदुसरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, धरणात साठलेल्या गाळामुळे कमी होत चाललेला पाणीसाठा, तसेच झपाटय़ाने वाढणारी लोकसंख्या यामुळे भविष्यात शहराला पाणीटंचाईला चांगलेच तोंड द्यावे लागेल, हे लक्षात घेऊन नगराध्यक्षांनी पाठपुरावा करून शहरासाठी ६० किलोमीटर अंतरावरील माजलगाव धरणातून पाणीपुरवठा योजना मंजूर केली. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन १०० कोटींची योजना मंजूर करून घेतली. इतर ठिकाणचे पाण्याचे स्रोतही आटले असल्याने ग्रामीण भागात टँकरशिवाय पर्याय राहिला नाही. नवीन पाणीयोजना केली नसती, तर यावर्षी पाण्यासाठी शहरवासीयांना स्थलांतरीत होण्याचीच वेळ आली असती. मात्र, आता जुलैपर्यंत तरी शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नसल्याने नागरिकांची भटकंतीपासून तूर्त सुटका झाली आहे.