बाल वैज्ञानिक घडविण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने २०१३-१४ वर्षांच्या अंदाजपत्रकात तरतूद केली असून याशिवाय शिक्षकेतर कर्मचारी संशोधन प्रोत्साहन या नवीन योजनेचा समावेश आहे. कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत अंदाजपत्रक समितीचे अध्यक्ष डॉ. अरविंद चौधरी यांनी २०१३.१४ या वर्षांचे तसेच २०१२-१३ चे सुधारित अंदाजपत्रक सादर केले. १२ कोटी ९२ लाख रुपयांची तूट दर्शविणाऱ्या अंदाजपत्रकात विविध उपक्रमांवर वाढीव तरतूद करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर सर्वत्र संशोधनाला महत्व प्राप्त होत असताना विद्यापीठ परीक्षेत्रातील प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आदिंसाठी प्रोत्साहनपूर्व योजना विद्यापीठातून सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. विद्यापीठाच्या विविध योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यात कमवा व शिकवा योजनेतंर्गत ६० लाखाच्या तरतुदीत १० लाखाची वाढ, युवारंग व युवक महोत्सवासाठी चार लाखाची वाढ, एकलव्य विद्याधन योजनेत दोन लाख ४० हजार रूपये वाढ, विद्यार्थी सुरक्षा योजना आठ लाख रुपये, अशी वाढीव तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेसाठी १९० लाखांवरून २५० लाखापर्यंत वाढ करण्यात आली आहे. विद्यापीठात परदेशी भाषेच्या ज्ञानासाठी विदेशी भाषा अभ्यासक्रम, जागतिक स्तरावरील माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी डिजिटल नॉलेज सेंटर, व्यावसायिक शिक्षणासाठी विशेष अभ्यासक्रम, माहिती तंत्रज्ञान जागृती अभियान, नंदुरबार येथे अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, तसेच अमळनेर येथील प्रताप तत्वज्ञान केंद्रात भारतीय तत्वज्ञान परिचय अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात येणार आहे.