सांगली जिल्ह्यातील २८६ पैकी अवघ्या ७१ नळपाणी योजना पूर्ण झाल्या असून अन्य योजनांचे काम रखडल्याप्रकरणी पाणी पुरवठय़ाच्या पाच उपअभियंत्यांसह २०  शाखा अभियंत्यांना नोटिसा देण्यात येणार आहेत. काही शाखा अभियंत्यांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीय पेयजल योजनेतून सुरु असणाऱ्या नळपाणी योजनांचा आढावा एका बठकीत घेतला. मार्चपर्यंत २८६ पाणी योजना पूर्ण करण्याचे आव्हान ग्रामीण पाणी पुरवठा विभागासमोर ठेवण्यात आले होते. मात्र आतापर्यंत केवळ ७१ योजनाच पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित योजना मार्चपर्यंत पूर्ण होणार का, यावरुन डॉ. प्रशांत नारनवरे यांनी विभागाची झाडाझडती घेतली. केवळ कार्यालयात बसून या योजना पूर्ण होणार नाहीत तर त्यासाठी कार्यक्षेत्रातच जायला हवे असेही त्यांनी सांगितले.
जत आणि तासगाव उपविभागाकडील अनेक योजना रखडल्या आहेत. जत, तासगाव, पलूस, मिरज, कवठेमहांकाळ, शिराळा आदी तालुक्यातील पाच उपअभियंते व २० शाखाअभियंते यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश डॉ. नारनवरे यांनी दिले.