*  सुमारे तीन हजार मीटर घाटांचे बांधकाम करणार
*  पूररेषेद्वारे स्वत: आखलेली लक्ष्मणरेषा ओलांडणार
पावसाळ्यात शहरास महापुराचे तडाखे बसण्याची टांगती तलवार सदैव लटकत असल्याने गोदावरीच्या पात्रातील बांधकामांविरोधात आजवर वारंवार आक्षेप नोंदविणाऱ्या पाटबंधारे विभागाने आता सिंहस्थाच्या निमित्ताने स्वत: घाटांचे बांधकाम करण्यास पुढाकार घेत आपल्या मूळ भूमिकेला हरताळ फासला आहे. नदीपात्र व लगतच्या परिसरात पक्क्या स्वरूपाच्या बांधकामांवर र्निबध घालण्यासाठी पूररेषा साकारणारा हा विभाग आता नदीपात्र व लगतच्या परिसरात घाटाचे बांधकाम करून अतिक्रमण करणार आहे. सिंहस्थाच्या अनुषंगाने करावयाच्या या कामास प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी या विभागातील अधिकाऱ्यांची चाललेली लगीनघाई आश्चर्यकारक ठरली आहे.
सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपल्याने त्याच्याशी निगडित कामे शक्य तितक्या लवकर सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नरत आहे. पर्वणी काळात गोदावरी पात्रात स्नान करण्यासाठी जमणाऱ्या लाखो भाविकांची व्यवस्था करण्याच्या उद्देशाने कन्नमवार पुलाच्या खालील बाजूस तसेच दसकपंचक या ठिकाणी गोदावरी नदीच्या दोन्ही तिरांवर एकूण तीन हजार मीटर अंतराचे घाट नव्याने बांधण्यात येणार आहे. भाविकांच्या गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी हे नवीन घाट अनिवार्य असल्याचे सांगितले जाते. या कामांची जबाबदारी प्रथमच पाटबंधारे विभागाने स्वीकारली आहे. मागील सिंहस्थात ते काम महापालिकेने केले होते. त्या घाटांसह गंगाघाट व रामकुंड परिसरातील सिमेंट काँक्रिटच्या पक्क्या स्वरूपाच्या बांधकामांचा गोदावरीला पडलेल्या वेढय़ावर पाटबंधारे विभागाने नेहमी बोट ठेवले आहे. शहरातून जाणाऱ्या गोदावरीच्या पात्रात ठिकठिकाणी अतिक्रमणे झाल्यामुळे नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता निम्म्याहून अधिकने कमी झाल्याचे हा विभाग सांगतो. महापालिकेच्या योजना, पात्रालगत निकषांकडे कानाडोळा करत महापालिकेने बांधलेले पूल, गोदाघाट व रामकुंड परिसरातील पक्की बांधकामे या प्रत्येकावर या विभागाने आक्षेप नोंदविले आहेत. २००८ मध्ये शहराला महापुराचा सामना करावा लागल्यानंतर पूररेषा आखणीसाठी या विभागाने कमालीचा पाठपुरावा केला. पूररेषेची आखणी झाल्यामुळे नदी पात्र व लगतच्या भागात बांधकामे होणार नाहीत, अशी व्यवस्था निर्माण झाली. पूररेषेद्वारे स्वत: आखून दिलेली लक्ष्मणरेषा आता हा विभाग घाट बांधकामाद्वारे ओलांडणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात गोदावरी नदीत पवित्र स्नानाचा योग साधण्यासाठी लाखो भाविक दाखल होण्याचा अंदाज आहे. गोदावरी पात्रात व लगत सध्या अस्तित्वात असणारे घाट त्यासाठी पुरेसे ठरणार नसल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. यामुळे नाशिक व नगर पाटबंधारे विभागाकडून कन्नमवार पुलाच्या खालील बाजूस ते लक्ष्मीनारायण मंदिर या परिसरात तसेच दसकपंचक, नासर्डी व गोदावरी नदीच्या संगमावरील खालील भागात वेगवेगळ्या आकाराचे घाट
नव्याने साकारले जाणार आहेत. पाटबंधारे विभागातील काही अधिकाऱ्यांनी या कामात खास रस दाखविला, पण त्यामुळे आपल्या विभागाच्या आजवरच्या मूळ भूमिकेला तिलांजली दिल्याचे दिसत आहे. या कामास विलंब होत असल्याचे कारण दाखवून मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेकडून युद्धपातळीवर रचनेचे नकाशे तयार करवून घेतले गेले. या कामास प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी सध्या या कामांची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.

..ही तर काळाची गरज
पात्रालगत नव्याने बांधल्या जाणाऱ्या घाटांमुळे गोदावरीच्या प्रवाहावर काही अंशी परिणाम होणे साहजिकच असले तरी आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन तसे अडथळे निर्माण होऊ नये म्हणून दक्षता घेतली जाईल. सिंहस्थात जमणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या मागणीवरून नदीलगतच्या घाटांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. पूर्वी रामकुंड परिसरात थेट नदीच्या मध्यभागी बांधकामे करून प्रवासात अडथळे आणले गेले. तसा प्रकार नव्या कामांमध्ये होणार नाही. नव्या घाटांच्या कामाकडे पाटबंधारे विभाग काळाची गरज म्हणून पाहात आहे.
    – एम. के. पोखळे,
    अधीक्षक अभियंता,
        लाभक्षेत्र विकास प्राधिकरण.