News Flash

माळशेज घाटातील प्रवास आता अधिक सुलभ

* २६ धोकादायक वळणांची तीव्रता कमी * दरडग्रस्त ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण ठाणे, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्य़ांच्या सीमारेषेवर असणाऱ्या माळशेज घाट परिसरात सध्या राष्ट्रीय महामार्ग

| April 3, 2013 01:51 am

*  २६ धोकादायक वळणांची तीव्रता कमी
*  दरडग्रस्त ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण
ठाणे, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्य़ांच्या सीमारेषेवर असणाऱ्या माळशेज घाट परिसरात सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सुरू असणाऱ्या कामांमुळे या घाटातील प्रवास अधिक सुलभ होणार आहे. पावसाळ्यात मुंबई-ठाणे-पुणे या महानगरांमधील पर्यटनप्रेमींचे प्रमुख आकर्षण असलेल्या या घाटात वारंवार दरड कोसळून वाहतुकीचा खोळंबा होतो. आता घाटातील दरडग्रस्त ठिकाणच्या रस्त्याची रुंदी आठ मीटरने वाढविण्यात आली असून त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता प्रदीप दळवी यांनी व्यक्त केला आहे. माळशेज घाट मार्गातील वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक असणाऱ्या तब्बल २६ वळणांची तीव्रता कमी करण्यात आली असून रस्त्याचे डांबरीकरण केले जात आहे. तसेच अभियांत्रिकी कौशल्य वापरून चढणांची तीव्रताही कमी करण्यात येत आहे. घाटातील ही सर्व कामे मे महिन्याअखेरीस पूर्ण होऊन पावसाळ्यापूर्वी घाट अधिक सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी सज्ज होणार आहे. निसर्ग सौदर्याने नटलेल्या माळशेजचे पर्यटन महात्म्य केवळ पावसाळ्यापुरते मर्यादित राहू नये म्हणून गेल्या वर्षांपासून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या माध्यमातून घाटात विविध विकास कामे सुरू आहेत. आतापर्यंत दोन ठिकाणी पार्किंग तर एक पॉईंटचे काम पूर्ण झाले आहे. आता आणखी एक पॉईंट तसेच बुरूज उभारण्याचे काम सुरू आहे.    एकमेकांसमोरील पॉईंट रोपवेने जोडण्यात येणार आहेत. तसेच स्थानिक महिला बचत गटांना घाटात स्थानिक रानमेवा  तसेच खाद्यपदार्थ विकण्यास स्टॉल दिले जाणार आहेत. पावसाळ्यात घाटातील डोंगर माथ्यांवरून कोसळणाऱ्या धबधब्यांपाशी पर्यटकांना नीट जाता यावे, म्हणून सीमेंटच्या पायऱ्या बांधण्याचे कामही सुरू आहे. घाटाच्या पायथ्याशी असलेल्या थितबी येथे पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा असणारी परंतु आदिवासी पद्धतीची निवासस्थाने उभारण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 1:51 am

Web Title: now malshej ghat travel becoming more easy
टॅग : Malshej Ghat,Thane
Next Stories
1 कळवा-मुंब्य्राचा विकास ठाण्याच्या पथ्यावर
2 युरोप-इंग्लंडमधील बर्फ हापूस आंब्याच्या मुळावर
3 विनापरमीट रिक्षा चालविणारा रेल्वे कर्मचारी अटकेत
Just Now!
X