स्कूल बसेस आता लग्नकार्यात मग्न झालेल्या आहेत. शाळांना सुटी लागल्यानंतर एक मिळकतीचा धंदा म्हणून बस मालकांनी वऱ्हाड वाहून नेण्याचे काम सुरू केले आहे. बसचा मालकच गाडीचा चालक म्हणून काम करून मुलांच्या शाळा सुरू होईपर्यंत जेवढी कमाई करता येईल, तेवढी करून घेण्याच्या मार्गावर आहेत. सुटीच्या दिवशी चालक व वाहक गरजू प्रवाशांना गाडीत बसवून जोडधंदाही करू लागले आहेत.
नागपुरातून गोंदिया, भंडारा, वर्धा, देवरी, परतवाडा, वरठी, वेलतूर आणि तालुक्यादरम्यान बऱ्याच सोयरिकी जुळतात. स्कुलबसमध्ये दहा-बारा वऱ्हाडी जास्त झाले तरी सामावून घेतले जातात. पूर्वी सायंकाळच्या लग्नांना प्राधान्य दिले जायचे. सामान्य घरातील वर पक्षाकडून सायंकाळच्यावेळी ट्रॅक्टर, ट्रक किंवा राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची सोय केली जायची. गावाच्या जवळच गाव असले तर बैलगाडय़ा (खासरं) जुंपली जायची.
 हल्ली वेळ, उन्हं आणि प्रवाशांची सोय लक्षात घेऊन ट्रॅक्स, खाजगी ट्रॅव्हल्सला पसंती दिली जाते. अर्थात गावाच्या अंतरानुसार पैसे ठरवले जातात. त्यासाठी आरटीओशी देवाणघेवाण केली जाते. मात्र, वऱ्हाड वाहून नेताना कोंबून भरलेले वऱ्हाडी जेव्हा गाडीत उभे राहतात तेव्हा वाहतूक पोलिसांपासून वाचवण्यासाठी स्कूल बसचालकाला आणि वऱ्हाडय़ांनाही बरीच कसरत करावी लागते. उन्हाचा कहर लक्षात घेता नागरिकही राज्य परिवहन महामंडळाच्या बस किंवा खाजगी ट्रॅव्हल ऐवजी या स्कूल बसला प्राधान्य देताना दिसतात. कारण त्यांच्यापेक्षा निश्चितच कमी भाडय़ावर काम करता येते.