अभियांत्रिकी किंवा एमबीएच्या अध्र्या जागा शिल्लक राहण्याची स्थिती निर्माण झाली असतानाच चित्रकला क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा चौपटीने ओघ आहे. दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी बीएफएला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. बारावीनंतर विज्ञान किंवा वाणिज्य विषयाशी निगडित अभ्यासक्रमांना गर्दी असते असे नव्हे तर कला क्षेत्रातही मोठय़ा संख्येने विद्यार्थी प्रवेश घेतात.
कला संचालनालयातर्फे राज्यात गेल्या २५ मे रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अप्लाईड आर्टस् अ‍ॅण्ड क्राफ्ट्स सामाईक प्रवेश परीक्षा (एमएच-एएसी-सीईटी २०१३) तब्बल १९०० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले. महाराष्ट्रात विविध बीएफएच्या सात विषयांना मिळून ५४० जागा आहेत. त्यासाठी जवळपास १९०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यातील १,७७५ विद्यार्थी महाराष्ट्रीय होते तर ९५च्यावर विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरचे आहेत. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, सर जे.जे. इन्स्टिटय़ुट ऑफ अप्लाईड आर्ट, नागपूरचे शासकीय चित्रकला महाविद्यालय, औरंगाबादचे शासकीय स्कुल ऑफ आर्ट, मुंबईचे रचना सान्सद कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट आणि क्राफ्ट, सावंतवाडीचे बी.एस. बानडेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट, पद्मश्री डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट आणि पुण्याचे भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाईन आर्टमध्ये बीएफएला प्रवेश देणे सुरू आहे. अप्लाईड आर्टबरोबरच पेंटिंग, टेक्सटाईल डिझाईन, इन्टेरिअर डेकोरेशन, स्कल्पचर, मेटल वर्क आणि सिरेमिक असे सात विषय आहेत. त्यात सर्वात जास्त मागणी अप्लाईड आर्ट या विषयाला आहे. मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या तिन्ही ठिकाणी शासकीय चित्रकला महाविद्यालये आहेत तर उर्वरित चित्रकला महाविद्यालये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मान्यता असलेले विना अनुदानित तत्त्वावर सुरू आहेत. यातील केवळ शासकीय महाविद्यालयांकडेच नव्हे तर विनाअनुदानित महाविद्यालयांमध्येही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. १८५७साली स्थापन झालेले सर जे.जे. स्कुल ऑफ आर्टला राज्यभरातीलच नव्हे तर इतर राज्यातील विद्यार्थ्यांचीही प्रथम पसंती असते.
सध्या या आठही महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या फेरीपर्यंत ४७० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. त्यापैकी सर्व प्रवर्ग मिळून १३४ मुली आहेत. डिफेन्स प्रवर्गातून २० विद्यार्थी तर अपंग १० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. इतर राज्यातील २२ विद्यार्थी आहेत तर जम्मू आणि कश्मिरमधील २८ विद्यार्थ्यांनी बीएफएला प्रवेश घेतला आहे. सर जे.जे. स्कुल ऑफ आर्टमध्ये ७५ जागांपैकी ७२ जागांवर प्रवेश झाले. जे.जे. इन्स्टिटय़ुट ऑफ अप्लाईड आर्टमध्ये १०० जागांपैकी ९५वर प्रवेश करण्यात आले. नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयात ६० जागा असून पैकी ५८  जागांवर प्रवेश झाले आहेत. औरंगाबादच्या महाविद्यालयात ६५ जागांपैकी ६२ प्रवेश झाले आहेत. उर्वरित मुंबईच्या रचना सान्सद, बानडेकर, डी.वाय. पाटील आणि भारती विद्यापीठाच्या महाविद्यालयात प्रत्येकी ६० जागा असून प्रत्येक संस्थेत ४६ प्रवेश झाले आहेत. अशा एकूण ४७० जागांवर दुसऱ्या फेरीत प्रवेश झाले आहेत. अद्याप समुपदेशन फेरी बाकी आहे.